जनजागृतीसाठी अख्खे प्रशासन झटले, तरीही मतदार घटले! अधिकारी राबूनही मतदार राजा नाराजच
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 13, 2024 08:16 PM2024-05-13T20:16:40+5:302024-05-13T20:17:20+5:30
सायंकाळी सहा वाजेपर्यंत फक्त ५० टक्के मतदान झाले. त्यामुळे दीड महिना अधिकाऱ्यांनी जनजागृती करूनही मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे....
पिंपरी :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदानात मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात ऊरण, मावळमध्ये सर्वाधिक मतदान झाले. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत फक्त ५० टक्के मतदान झाले. त्यामुळे दीड महिना अधिकाऱ्यांनी जनजागृती करूनही मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
मावळ लोकसभेअंतर्गत येणाऱ्या पुणे आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तरीही मतदानाच्या दिवशी टक्केवारी वाढविण्यात अपयश आले. जवळपास टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही किंवा बजावता आला नाही. राजकीय पक्षांपेक्षाही प्रशासनाकडे मोठी आणि सक्षम यंत्रणा असतानाही ती यंत्रणा मतदारांपर्यंत पोहचलीच नाही का असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
जनजागृसाठी ‘स्वीप’ उपक्रम...
लोकसभेसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृतीपर अनेक उपक्रम घेण्यात आले. त्यात मतदान शपथ, रील्स स्पर्धा, बाईक रॅली, महाविद्यालय, फ्लेक्स, वाहनांवर एलईडी स्क्रीन्स, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणीही नागरिकांमध्ये मतदानांविषयी जनजागृती करण्यात आली होती.
मतदार परत माघारी गेले...
पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतील मतदान केंद्राच्या प्रवेश द्वारावर मोबाईल आत नेण्यास मनाई असल्याच्या सूचना फलक लावण्यात आला होता. मतदान केंद्राच्या प्रवेश द्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. अनेक मतदार मोबाईल घेऊन येत होते. पण, त्यांना प्रवेशद्वारा अडवून मोबाईल नेण्यास बंदी असल्याचे सांगितले. त्यानंतर मतदारांना माघारी पाठवले जात होते. शंभर मीटरच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सोय नसल्याने पोलीस प्रशासन आणि मतदार यांच्यामध्ये वादाचे प्रसंग ओढावत होते. तसेच अनेक मतदार मतदान न करताच पुन्हा माघारी घराकडे फिरु लागल्याचे दिसून आले.
...म्हणून मोबाईल बंदी-
पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामधील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामध्ये अनेक मतदारांनी त्यांच्या उमेदवाराला मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामधून निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मावळ लोकसभेच्या पिंपरी - चिंचवड विधानसभेमध्ये जिल्हाधिका-यांच्या आदेशानूसार मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता.