नवमतदारांच्या हाती आमदारांचे भवितव्य; चिंचवडमध्ये ४९ हजार ५७९ नव्या नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:58 AM2023-01-23T10:58:32+5:302023-01-23T10:59:07+5:30
जाहीर केलेल्या मतदार यादीनुसार शहराची मतदार संख्या १४ लाख ४६ हजार १४९ असून त्यात आता ५४ हजारांची घट
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोट निवडणूक जाहिर झाली आहे. पुणे जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यात चिंचवडमध्ये ४९ हजार ५७९ नवीन मतदार नोंदणी झाली आहे. तर जिल्ह्यातील सर्वांत मोठा मतदारसंघ ठरला आहे. निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने नवमतदार चिंचवडचा आमदार ठरविणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ३१ मे २०२२ पर्यंतची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरली. त्यानुसार प्रभागनिहाय विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २३ जून रोजी महापालिकेने प्रसिद्ध केली. त्यावर हरकती व सूचना मागवल्या होत्या. दुरुस्त्या केल्या. मात्र, महापालिका निवडणूक जाहीर होण्याऐवजी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. तशीच राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदार याद्यांचे काम पूर्ण झाले आहे
दुरुस्तीतून घटले ५४ हजार मतदार
गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मुळशी या तीनही विधानसभांचे क्षेत्र येते. त्यामुळे गेल्यावर्षी केलेल्या मतदार यादी तपासणी मोहिमेत मतदार संख्या १५ लाख ६९३ होती. प्रभागनिहाय मतदार यादींची विभागणी केली. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार एक जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. जाहीर केलेल्या मतदार यादीनुसार शहराची मतदार संख्या १४ लाख ४६ हजार १४९ होती. त्यात आता ५४ हजारांची घट झाली आहे.
यामुळे झाले मतदार कमी
१) मतदार ओळख पत्राला आधार कार्ड लिंक नसणे.
२) नाव, वय, पत्ता दुरुस्ती.
३) मृत्यू व नवीन नोंदणी अशी दुरुस्ती केली.
असे आहेत शहरातील मतदार
१) ३१ मे २०२२ : १५,००,६९३
२) ५ जानेवारी २०२३ : १४,४६,९५८
३) मतदार घट : ५३,७३५.