क्रिएटिव्ह अकादमीच्या अनधिकृत बांधकामावर पडणारा हातोडा
By विश्वास मोरे | Published: February 12, 2024 05:23 PM2024-02-12T17:23:53+5:302024-02-12T17:24:48+5:30
क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात उघड झाली
पिंपरी: रावेत येथील क्रिएटिव्ह अकादमीच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या वतीने हातोडा फिरविण्यात येणार आहे. अकादमीच्या इमारत मालकाला महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने नोटीस दिलेली आहे. अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात उघड झाली. त्यानंतर शेख याचे अनेक कारनामे उघड होत आहेत. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची समांतर चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी नौशाद शेख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पॉस्को आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.
महापालिका पथकाने केली जागेची पाहणी!
क्रिएटिव्ह अकादमीची निवासी शाळा रावेत इथे आहे. हा परिसर महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतो. क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी अकादमीच्या निवासी शाळेत जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना ओपन स्पेस आणि साईड मार्जिनमध्ये अनधिकृत बांधकाम आढळून आले आणि पत्रा शेड व स्टोअर रूम केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने इमारतीचे मालक यांना नोटीस देण्यात आली आहे.
काय आहे नोटीसमध्ये!
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पथकाने आपल्या इमारत परिसराची पाहणी केली. त्यामध्ये साईड मार्जिन आणि इतर भागांमध्ये आपण पत्राशेड उभारली आहे. तसेच काही भाग कव्हर केला आहे. संबंधित वाढीव बांधकाम ३० दिवसाच्या आत काढून टाकावे अन्यथा महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल. तसेच कारवाई साठी लागणारा खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल, असे नोटीस मध्ये नमूद केले आहे.
क्रिएटिव्ह अकादमी बाबत तक्रार आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. बांधकाम परवानगी विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी केली. त्यामध्ये काही वाढीव बांधकाम आढळले आहे. संबंधित इमारत ही पीएमआरडीए च्या हद्दीतील आहे. त्यास पीएमआरडीचा परवाना असल्याची माहिती पुढे आली आहे. अनधिकृत वाढीव बांधकाम महापालिकेच्या वतीने पाडण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. नोटीसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पाडण्यात येईल. -अमित पंडित (क्षेत्रीय अधिकारी ब प्रभाग)