इन्शुरन्सचे हफ्ते एजंटनेच केले गडप; तब्बल दोन लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 08:43 AM2022-11-16T08:43:12+5:302022-11-16T08:43:19+5:30
विश्वास ठेवून इन्शुरन्स एजंटकड़ून मुलीची पॉलीस काढली
पिंपरी : विश्वास ठेवून इन्शुरन्स एजंटकड़ून मुलीची पॉलीस काढली. त्यासाठी सहा वर्ष पॉलिसीचे हफ्ते भरले. मात्र, एजंटने हफ्ताचे पैसे स्वत:कडे ठेवून तब्बल दोन लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सन २०१४ ते १४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हिंजवडी येथे घडला. या प्रकरणी सयाजी रावसाहेब ओलेकर (वय ४२, ढवळे बिल्डिंग, मारुंजी रोड) यानी सोमवारी (दि.१४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन काशिनाथ दिसले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मॅक्स इन्शुरन्सचे एजंट सचिन दिसले यांनी तुमच्या मुलीचे पॉलिस काढून देतो असे सांगितले. त्यासाठी २०१४ ते २०२० या कालावाधीत फिर्यादीकडून ऑनलाईन आणि रोख स्वरुपात पैसे घेतले. मात्र, पैशाची कोणतीही रिसीट दिली नाही. फिर्यादीने रिसीटीची मागणी करता आज देतो, उद्या देतो असे करून आरोपीने रिसीट देण्यास टाळाटाळ केली. तसेच इन्शुरन्ससाठी दिलेले पैसे न भरता ते स्वत:साठी ठेवून फिर्यादीची तब्बल दोन लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली.