निगडीत भरधाव चारचाकी बंगल्याच्या संरक्षक भिंतीला धडकली, वाहन आगीत खाक
By नारायण बडगुजर | Published: April 20, 2024 11:11 AM2024-04-20T11:11:26+5:302024-04-20T11:11:53+5:30
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या प्राधिकरण उपकेंद्रातील एक बंब घटनास्थळी दाखल झाला होता...
पिंपरी : भरधाव चारचाकी वाहन बंगल्याच्या संरक्षक भिंतीला धडकले. त्यानंतर चारचाकी वाहनाने पेट घेतला. आगीत वाहन खाक झाले. निगडी प्राधिकरणातील छत्रपती संभाजी चौकात शनिवारी (दि . २०) रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणातील छत्रपती संभाजी चौकात एका चार चाकी वाहनाने पेट घेतला असल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या प्राधिकरण उपकेंद्रातील एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
प्राधिकरण उपकेंद्राचे मुख्य अग्निशामक विमोचक संजय महाडिक यांनी गाडीवर होजरील होजच्या साह्याने पाणी मारून आग पूर्णपणे नियंत्रणात आणली व कुलिंग करून घेतले. त्यांचे मदतनीस अनिल माने, शुभम पिंपळे आणि निरंजन लोखंडे यांनी सहकार्य केले. या
आगीत गाडीचे इंजिन, चारही सीट, गाडी केबिन, पुढचे दोन टायर, गाडीच्या संपूर्ण काचा इत्यादी नुकसान झाले. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. पेट घेतलेल्या गाडीच्या मालकाचे नाव समजू शकले नाही. ही गाडी बंगल्याच्या संरक्षक भिंतीला धडकली. त्यामुळे संरक्षक भिंतीचे नुकसान झाले, असे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले असल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.