'तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो...' इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने भाजे गाव दुर्घटनेला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:40 AM2023-07-21T11:40:40+5:302023-07-21T11:43:27+5:30
या दुर्घटनेमुळे मावळ तालुक्यातील भाजे गावात १९८९ मध्ये झालेल्या डोंगर खराळ दुर्घटनेच्या घटनेची सर्वांना आठवण झाली...
- विशाल विकारी
लोणावळा (पुणे) : मुसळधार पावसाने खालापूर तालुक्यामधील इर्शाळवाडी गावात भुस्खलन होऊन ३० हून अधिक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेमुळे मावळ तालुक्यातील भाजे गावात १९८९ मध्ये झालेल्या डोंगर खराळ दुर्घटनेच्या घटनेची सर्वांना आठवण झाली. २३ जुलै १९८९ या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास डोंगरावरील दगड व माती भाजे गावावर काळ बनून आले. तब्बल ३९ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो, अशी भावना या घटनेचे प्रत्यक्षदर्शी नंदकुमार पदमुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पदमुले म्हणाले, ही घटना घडली तेव्हा मी लहान होतो. सकाळी गावातील काही घरांवर खराळ पडल्याचे समजताच मी घरातून पळत सुटलो, घटना पाहिली व लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यासाठी पळत निघालो. कार्ला फाटा दरम्यान एका टेम्पोला हात केला व लोणावळा गाठला. त्याचवेळी लोणावळा धरण ओव्हरफ्लो झाल्याने लोणावळ्यात पाणी शिरले होते. आयएनएस शिवाजी व पोलिस यंत्रणा त्याठिकाणी बचाव कार्य करत होते. त्यांना भाजे गावातील माहिती दिल्यानंतर ती सर्व यंत्रणा गावात आली. त्यांनी बचावकार्य सुरू केले. मातीचे ढिगारे व दगड बाजूला करत एकएक मृतदेह व जखमी यांना बाहेर काढले जात होते. आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा पाऊस व त्यामध्ये गावातील नागरिकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता.