दोन लाखांचा हरवलेला लॅपटाॅप २ तासांत मिळाल्याने तरुणी भारावली अन् करिअरही वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 04:28 PM2023-01-22T16:28:18+5:302023-01-22T16:28:34+5:30

पोलिसांची सतर्कता आणि रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा यामुळे अभियंता तरुणी भारावली

The lost laptop worth two lakhs was found within 2 hours and the young woman's career was saved | दोन लाखांचा हरवलेला लॅपटाॅप २ तासांत मिळाल्याने तरुणी भारावली अन् करिअरही वाचले

दोन लाखांचा हरवलेला लॅपटाॅप २ तासांत मिळाल्याने तरुणी भारावली अन् करिअरही वाचले

googlenewsNext

पिंपरी : आयटी पार्कमधील नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळाल्याने आंध्रप्रदेश येथील तरुणी हिंजवडी येथे आली. त्यावेळी तिचा दोन लाखांचा लॅपटाॅप रिक्षामध्ये विसरली. याबाबत पोलिसांनी रिक्षा चालकांशी संपर्क साधला. त्यानंतर रिक्षाचालकाने लगेचच लॅपटाॅप परत केला. पोलिसांची सतर्कता आणि रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा यामुळे अभियंता तरुणी भारावली आणि हसतमुखाने हैदराबादकडे रवाना झाली.    

 साईश्री मादपूर (रा. आंध्रप्रदेश), असे तरुणीचे नाव आहे. तिचा पहिलाच जाॅब म्हणून ती हिंजवडी आयटी पार्क येथील एका नामांकित कंपनीत आली. ‘वर्क फ्राॅम होम’साठी कंपनीने साईश्री हिला दोन लाख रुपये किमतीचा लॅपटाॅप दिला. त्यानंतर साईश्री मैत्रीणीसह एका रिक्षातून सायंकाळी सातच्या सुमारास वाकड येथील भुजबळ चौकात आली. ताथवडे येथील रिक्षाचालक स्वप्नील बोराडे यांच्या रिक्षातून ती भुजबळ चौकात आली. मात्र, घाईगडबडीत लॅपटाॅप असलेली बॅग रिक्षातच विसरली.

पहिलाच जाॅब म्हणजे करिअरची सुरुवात होय. त्यात कंपनीने दिलेला लॅपटाॅप हरवल्याने करिअरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होणार, या विचाराने साईश्री घाबरली. तिने वाकड पोलीस चौकी गाठली. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार यांना हकिगत सांगितली. उपनिरीक्षक गिरनार यांनी भुजबळ चौकातील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व रिक्षाचालक यांच्याशी संपर्क साधला. लॅपटाॅपची बॅग शोधण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. त्यानुसार रिक्षाचालक अविनाश गुंड यांनी व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज केला. 

प्रवासी तरुणी तिची बॅग आपल्या रिक्षात विसरली आहे, हे रिक्षाचालक स्वप्नील बोराडे यांच्या लक्षात आले. दरम्यान व्हाटसअप ग्रुपवरील मेसेजही त्यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी घरकुल येथील रिक्षाचालक रवी दळवी यांना संपर्क साधला. त्यांनी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी अविनाश गुंड यांना माहिती दिली. त्यानंतर ते सर्व जण वाकड पोलीस चौकीत आले. साईश्रीला लॅपटाॅप परत केला. त्यानंतर रात्री नऊला खासगी ट्रॅव्हल्स बसने साईश्री हैदराबादकडे रवाना झाली.   

''लॅपटाॅप परत मिळाल्याने तरुणीने बक्षीस म्हणून पैसे देऊ केले. मात्र, आम्ही ते घेतले नाहीत. आपल्या शहरात येणाऱ्या प्रवाशांना चांगली सेवा प्रामाणिकपणे देणे हे प्रत्येक रिक्षावाल्याचे कर्तव्य आहे. यातून रिक्षाचालकांची सेवा, आपले शहर आणि राज्याबाबतही सकारात्मक संदेश जाण्यास मदत होईल.   - रवी दळवी, रिक्षाचालक, घरकुल, चिखली''   

Web Title: The lost laptop worth two lakhs was found within 2 hours and the young woman's career was saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.