नाव स्पा सेंटरचे अन् चालायचा वेश्याव्यवसाय! आकुर्डीत पीडित दोन महिलांची सुटका
By नारायण बडगुजर | Published: December 25, 2023 08:53 PM2023-12-25T20:53:33+5:302023-12-25T20:54:06+5:30
आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉलमधील ब्लू स्टोन्स स्पा येथे शनिवारी (दि. २३) ही कारवाई केली....
पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकून पीडित दोन महिलांची सुटका केली. आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉलमधील ब्लू स्टोन्स स्पा येथे शनिवारी (दि. २३) ही कारवाई केली.
स्पा सेंटरचा व्यवस्थापक राकेश शिंदे (२५, रा. दापोडी), स्पा मालक निकिता कांबळे आणि अक्षय बनकर (३०) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलिस हवालदार सुनील शिरसाट यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथे ब्लू स्टोन्स स्पा नावाने स्पा सेंटर चालवत होते. स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. याबाबत पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत तीन हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.