जिच्यासाठी आलो तिचे शेवटचे दर्शनही होऊ शकले नाही; अखेर धगधगत्या चितेवर ठेवली माहेरची साडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 11:07 AM2022-10-20T11:07:19+5:302022-10-20T11:07:36+5:30
पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात मृतदेहांच्या अदलाबदलीमुळे उडाला होता गोंधळ
पिंपरी : भिंत पडून आमची बहीण गंभीर जखमी झाल्याचे समजताच आम्ही अहमदाबाद येथून निघालो. दरम्यान रात्री बहिणीचा मृत्यू झाल्याचे समजले. आम्ही स्वत:ला सावरत सकाळी दापोडी येथे पाेहचलो. मात्र, आम्ही जिच्यासाठी धावत आलो तिचे अखेरचे दर्शन होऊ शकले नाही. मृतदेह बदलल्याने तिच्यावर दुसऱ्याच कुटुंबाने अंत्यसंस्कार केले. भरल्या कपाळाने निधन झालेल्या आमच्या बहिणीसाठी आणलेली माहेरची अखेरची साडीही तिच्या मृतदेहावर ठेवता आली नाही. तिच्या धगधगत्या चितेवरच साडी ठेवावी लागली, या भावना दीपक आणि धर्मेंद्र शिंदे या दोन भावांनी व्यक्त केल्या.
स्नेहलता अशोक गायकवाड (वय ६१), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दापोडी येथील स्नेहलता गायकवाड यांच्या मागे पती अशोक, मुलगा मोहन आणि युवराज, तसेच भाऊ दीपक आणि धर्मेंद्र शिंदे असा परिवार आहे. स्नेहलता यांच्या मृतदेहाचे बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाले. गुजरात येथून त्यांचे भाऊ, नणंद आणि इतर नातेवाईक येणार असल्याने सर्वांना त्यांची प्रतीक्षा होती. दरम्यान भाऊ दीपक आणि धर्मेंद्र शिंदे हे दोघेही दापोडी येथे आले. मात्र, मृतदेह बदलला असून स्नेहलता गायकवाड यांच्या मृतदेहावर दुसऱ्या मयत महिलेच्या नातेवाईकांकडून अंत्यसंस्कार झाल्याचे समजताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला.
दोनदा अंत्यसंस्कार
गुजरात तसेच इतर ठिकाणांहून येथून रेल्वे, बस अशा वाहनाने नातेवाईक दापोडी येथे आले. मात्र स्नेहलता यांचे अखेरचे दर्शन होऊ शकले नाही. त्यांनी दापोडी येथून पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय गाठले. तेथून संत तुकाराम नगर पोलीस चौकी आणि त्यानंतर थेरगाव स्मशानभूमीत गायकवाड कुटुंबीय आणि नातेवाईक पोहचले. दरम्यान गाडे कुटुंबियांनी स्नेहलता गायकवाड यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला होता. त्याच चितेवर गायकवाड कुटुंबियांनी अंत्यसंस्काराचा विधी केला. त्यामुळे स्नेहलता गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्काराचा विधी दोन वेळा झाला.
आमची एकुलती एक मोठी बहीण होती
स्नेहलता ही आमची एकुलती एक मोठी बहीण होती. तिचे अखेरचे दर्शन होण्यासाठी आम्ही जिवाचे रान केले. मात्र, ते होऊ शकले नाही. तिच्यासाठी घेतलेली अखेरची माहेरची साडी देखील तिच्या मृतदेहावर ठेवता आली नाही. तिच्या चितेवर साडी ठेवली. - दीपक शिंदे
परंपरेनुसार अंत्यसंस्काराची तयारी केली होती
अंत्यसंस्कारासाठी आम्ही सर्व नातेवाईक दापोडी येथे आलो होतो. परंपरेनुसार अंत्यसंस्काराची तयारी केली होती. मात्र, मृतदेह बदलून आमच्या बहिणीवर अंत्यसंस्कार झाल्याचे समजताच आम्ही आणखी खचलो. - धर्मेंद्र शिंदे