रुग्णाने महिला डॉक्टरला ८९ लाखांना गंडवले! गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक
By रोशन मोरे | Published: October 9, 2023 09:38 AM2023-10-09T09:38:07+5:302023-10-09T09:38:45+5:30
पोलिसांनी संशयित बांधकाम व्यावसायिक राजेश घेवरचंद जैन (वय ४७, रा. फोर्ट, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे....
पिंपरी : मुंबईवरून चिंचवडमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाने महिलेला बांधकाम प्रकल्पात गुंतवणुकीच्या आमिषाने ८९ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०१२ ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत चेतना रुग्णालय, चिंचवड येथे घडली. या प्रकरणी महिला डॉक्टरने निगडी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.७) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित बांधकाम व्यावसायिक राजेश घेवरचंद जैन (वय ४७, रा. फोर्ट, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर यांच्याकडे संशयित राजेश हे उपचारासाठी येत होते. संशयिताने त्याच्या मुंबई येथील बांधकाम प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रकमेचा फ्लॅट देण्याचे आमिष संशयिताने महिला डॉक्टरला दाखवले. तसेच प्लॅट वाटप केल्याचे अलॉटमेंट पत्र ई-मेलवर पाठवून महिला डॉक्टरचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी या इमारत प्रकल्पामध्ये तब्बल ८९ लाख ५८ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, या इमारतीचे काम न करता तो प्रकल्प संशयिताने अर्धवट सोडून महिला डॉक्टरला फ्लॅट न देता ८९ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केली.
जीवे मारण्याची धमकी
फिर्यादी महिला डॉक्टर यांनी फ्लॅट अथवा त्यांच्या रकमेची मागणी संशयिताकडे केली. त्यावर ‘मी तुझी रक्कम देणार नाही. तुला जे काही करायचे आहे ते कर. मला परत रक्कम मागितली तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही. तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून उलट तुलाच येरवडा जेलमध्ये पाठवीन’, अशी धमकी संशयिताने दिली.