भरदिवसा गोंधळ घालणाऱ्या किटक टोळीची धिंड; मावळातील गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस आक्रमक

By नारायण बडगुजर | Published: May 28, 2023 05:45 PM2023-05-28T17:45:56+5:302023-05-28T17:46:40+5:30

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, पोलीस आयुक्तांची सूचना

The pestilence of the day long pestilence Police are aggressive to break the crime in Maval | भरदिवसा गोंधळ घालणाऱ्या किटक टोळीची धिंड; मावळातील गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस आक्रमक

भरदिवसा गोंधळ घालणाऱ्या किटक टोळीची धिंड; मावळातील गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस आक्रमक

googlenewsNext

पिंपरी : भरदिवसा गोंधळ घालत दहशत निर्माण  करणाऱ्या किटक टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने कारवाई करून टोळीतील गुन्हेगारांची तळेगाव दाभाडे येथे धिंड काढली. त्यामुळे मावळातील गुन्हेगारांची तंतरली आहे.    

किटक उर्फ जय प्रवीण भालेराव (वय १९), वैभव राजाराम विटे (२५, दोघेही रा. तळेगाव दाभाडे), विशाल शिवाजी गुंजाळ (२०, रा. वराळे), प्रदीप वाघमारे (२०, रा. वडगाव), रुतिक मेटकरी (२०, रा. देहूरोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. २४) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किटक याने साथीदारांसह तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा मुलींची नावे घेऊन गल्लीमध्ये आरडाओरडा केला. फिर्यादी महिलेला मारहाण करून विनयभंग केला. महिलेच्या दीराला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. लोकांना धमकावून दहशत केली. 

गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने आरोपींचा माग काढून अटक केली. गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना घटनास्थळी नेले. आरोपींची धिंड काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इतरांना यातून योग्य संदेश देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.    
 
टोळीतील सदस्यांवर गंभीर गुन्हे

किटक टोळीचा प्रमुख असलेला किटक भालेराव याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर स्वरुपाचे १० गुन्हे दाखल आहेत. त्यात दरोडा, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करून धमकी देणे व दहशत निर्माण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. तसेच आरोपी वैभव विटे याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात सात तर चाकण पोलिस ठाण्यात एक असे आठ विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी विशाल गुंजाळ, प्रदीप वाघमारे आणि रुतिक मेटकरी यांच्यासह विधीसंघर्षित बालकाच्या विरोधात देखील विविध गुन्हे दाखल आहेत.  

पोलिस आयुक्त ‘ॲक्शन मोड’मध्ये

भर दिवसा गुंडगिरीचा मावळ पॅटर्न मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे आक्रमक झाले आहेत. त्यासाठी त्यांनी गुन्हेगारांच्या आणि त्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय करू नका, अशा सूचना आयुक्त चौबे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. 

Web Title: The pestilence of the day long pestilence Police are aggressive to break the crime in Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.