‘आयटी पार्क’मधील कर्मचाऱ्यांना लुटण्याचा डाव उधळला; वाकड पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
By नारायण बडगुजर | Published: July 16, 2023 02:41 PM2023-07-16T14:41:22+5:302023-07-16T14:41:44+5:30
ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एक तलवार, दोन कोयते, मिरची पूड, दोन मोबाईल फोन, एक दुचाकी जप्त
पिंपरी : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव पोलिसांनी उधळून लावला. जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी येथे दबा धरून बसलेल्या चौघांना पकडले. रात्री घरी जात असलेल्या आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना लुटण्याचा त्यांचा डाव होता, असे चौकशीत निष्पन्न झाले. वाकड पोलिसांनी शनिवारी (दि. १५) रात्री दोनच्या सुमारास ही कारवाई केली.
वेंकटेश सुरेश नाईक (वय २४), चेतन काकासाहेब वाघमारे (वय २३), शेखर काळूराम जांबूरे (वय १९, तिघे रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार पळून गेला. पोलिस अंमलदार विनायक घारगे यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काहीजण संशयितपणे थांबले असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एक तलवार, दोन कोयते, मिरची पूड, दोन मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा कट
ताब्यात घेतलेल्या चौघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. आयटी पार्कमधील कर्मचारी रात्री काम संपल्यानंतर घरी जातात. या मार्गाने रात्री घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्याचा कट रचला होता, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.