पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 04:44 PM2024-12-09T16:44:27+5:302024-12-09T16:45:09+5:30

पालिकेचे सुमारे ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये भाडे दिलेले नाही.

The police are the defaulters of the municipality Pimpri-Chinchwad Police Commissionerate owes seven and a half crores | पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी

पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी

पिंपरी : सामान्य नागरिकांनी चुकीचे काम केले, कर थकविला की महापालिका आणि पोलिस कारवाई करतात. मात्र, भाडेतत्त्वावरील महापालिकेच्या २२ इमारतीचे भाडे पोलिसांनी थकविले आहे. पालिकेचे सुमारे ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये भाडे दिलेले नाही.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ ला करण्यात आली. त्यापूर्वी पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाणे मिळून शहरात पोलिस ठाणी होती. तेव्हा विविध भागात पोलिस ठाण्यासाठी महापालिकेने इमारती आणि जागा भाड्याने दिल्या आहे. नवीन आयुक्तालय सुरू झाल्यानंतर चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलिस आयुक्तालयासाठी देण्यात आली. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर आणि त्यापूर्वीही जागा भाड्याने दिल्या आहेत.

मुख्यालयासाठी निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळेची इमारत तसेच मोकळी जागाही दिली आहे. थेरगाव पोलिस चौकीसाठी महिला विकास केंद्राची इमारत अशा २२ इमारती महापालिकेने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. पोलिस उपायुक्त परिमंडळ तीनच्या कार्यालयासाठी जागा दिली आहे.

कार्यालयाचे नाव आणि थकबाकी पुढीलप्रमाणे आहे.
आयुक्तालय इमारत - २ कोटी ६० लाख ५६ हजार
दिघी ठाणे - १ कोटी ९१ लाख ३५ हजार
वाहतूक शाखा, चापेकर चौक  - १ कोटी ३१ लाख ७ हजार
पोलिस मुख्यालय, निगडी - ६० लाख ४९ हजार
थेरगाव चौकी - ३५ लाख २३ हजार
पोलिस उपायुक्त्त - १८ लाख ५६ हजार
सांगवी ठाणे - १० लाख ६४ हजार
गुन्हे युनिट -३,
मोहननगर -  ८ लाख ९७ हजार

आयुक्तालयासह पोलिस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. या भाड्यापोटी पोलिसांकडे ७ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. याबाबत पोलिस विभागाशी संवाद सुरू आहे. - मुकेश कोळप, सहायक आयुक्त

Web Title: The police are the defaulters of the municipality Pimpri-Chinchwad Police Commissionerate owes seven and a half crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.