पोलिसांनी सव्वातीनशे तळीरामांना आणले ताळ्यावर; थर्टी फर्स्टला तब्बल २० लाखांचा दंड वसूल
By नारायण बडगुजर | Published: January 1, 2024 08:28 PM2024-01-01T20:28:51+5:302024-01-01T20:29:18+5:30
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले होते
पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी पार्ट्यांचे नियोजन केले होते. थर्टी फर्स्ट जोरदार साजरा करत मद्यधुंदपणे वाहनचालविणाऱ्या ३२२ जणांना पोलिसांनीकारवाईचा दंडुका दाखवला. मद्यधुंद होऊन नववर्षाचे स्वागत करणाऱ्या या तळीरामांना पोलिसांनी ताळ्यावर आणले.
नववर्ष स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यात हाॅटेलसह माॅल, बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रविवारी (दि. ३१) सायंकाळपासून मोठा बंदोबस्त तैनात केली होता. बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले होते. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत होता. स्थानिक पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून गस्त घालण्यात आली. तसेच शहरात ४० ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. नववर्षाचे स्वागत करताना रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाई केली.
वाहतूक पोलिसांकडून कारवाई
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून मुख्य चौक, अंतर्गत रस्ते तसेच महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. यातील मद्यपी चालकांवर कारवाई केली.
हाॅटेल, ढाब्यांची तपासणी
पोलिस आयुक्तालयांतर्गत हाॅटेल, ढाब्यांसह विविध ४७३ आस्थापनांची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
रेकाॅर्डवरी ४१५ जणांना केले ‘चेक’
पोलिस आयुक्तालयांतर्गत रेकाॅर्डवरील तसेच विविध गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात आली. यात रविवारी रात्री ४१५ संशयितांना चेक करून आढावा घेण्यात आला.
संशयित वाहनांवर ‘वाॅच’
बंदोबस्त तसेच नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलिस आयुक्तालयांतर्गत रविवारी अशा संशयित २४२५ वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. यात बेशिस्त वाहनचालकांना २० लाख ६० हजार ८०० रुपयांचा दंड आकारला.
पोलिसांनी उधळला ‘डाव’
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जुगार अड्डा चालविण्यात येत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून जुगाराचा डाव उधळून लावला. तसेच अवैध दारू निर्मिती व विक्री प्रकरणी देखील कारवाई केली. यात एक जुगार अड्डा तसेच अवैध दारु प्रकरणी पाच कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख नऊ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी केलेली कारवाई
ड्रंक अँड ड्राईव्ह - ३२२
संशयित चेकिंग - ४१५
वाहने चेकिंग - २४२५
अवैध धंदे कारवाई - १०
आस्थापना चेकिंग - ४७३
अवैध धंदे कारवाईमधील जप्त मुद्देमाल - २०९८७५
वाहनांवर केलेल्या कारवाईचे दंडाची रक्कम - २०६०८००