मुख्यमंत्र्यांचे शिलेदार श्रीरंग बारणेंच्या घरासमोरील रस्ता चकाचक; तब्बल २५ कोटी खर्च करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 04:10 PM2022-12-07T16:10:31+5:302022-12-07T16:10:53+5:30
स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार रस्ते व पदपथ विकसित करण्यात येत आहे
पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पिंपरी-चिंचवड शहरातील शिलेदार समजल्या जाणाऱ्या खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरासमोरील रस्ता चकाचक करण्यात येणार आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक थेरगाव हा रस्ता आणि फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित होईल. त्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर महापालिकेतील वातावरण बदलले आहे. शहरातील शिवसेनेचे खासदार यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे आता महापालिकेत खासदारांची पॉवर वाढली असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार रस्ते व पदपथ विकसित करण्यात येत आहे. या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही अर्बन स्ट्रीट प्रकल्प फसला आहे, असे असताना आता या अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली प्रशासनाने पुन्हा कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक थेरगाव या रस्त्यावर अर्बन स्ट्रीटनुसार रस्ता व पदपथ विकसित करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे.
आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक या रस्त्यावर पदमजी पेपर मिलसारखा औद्योगिक प्रकल्प, बिर्ला हॉस्पिटल, पशुसंवर्धन खात्याचे डेअरी फार्म, शाळा, कॉलेज, व्यावसायिक व रहिवासी भाग आहे. वाहनांसोबतच पादचाऱ्यांचीही दाट वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतो. पदपथावर पुरेशी विद्युत व्यवस्था नसल्यामुळे इथे गैरकृत्ये घडतात. तसेच, वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्याची नागरिकांची व व्यावसायिकांची मागणी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
अंदाजपत्रकातील तरतुदीकडे दुर्लक्ष करून खर्च या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे. ॲश्युअर्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी विस्तृत सर्व्हेक्षण करून स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जल:निस्सारणविषयक कामाचे अंदाजपत्रक सन २०२२ -२०२३ च्या दरसूचीनुसार तयार केले आहे. त्यानुसार या रस्त्यांच्या कामासाठी २४ कोटी ९७ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. मात्र, पालिकेच्या सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकामध्ये या कामासाठी फक्त १० कोटी इतकी प्रशासकीय मान्यता आहे. परंतु, आयुक्त सिंह यांनी या रस्त्यांसाठी २४ कोटी ९७ लाख इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
आमदारांनंतर खासदारांची कामे मार्गी
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना शहरातील भाजपच्या विद्यमान आमदारांचा पालिकेत वरचष्मा होता तर शिवसेनेच्या खासदारांनी पालिकेत लक्ष घातले नव्हते. मात्र, सत्ताबदल होऊन बारणे यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर वातावरण बदलले आहे. आता भाजपच्या आमदारांनंतर शिंदे गटाच्या खासदारांचाही पालिकेत रूतबा वाढला असल्याची चर्चा यानिमित्ताने महापालिका वर्तुळात रंगली आहे.