शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले नाहीत; चिंचवडमध्ये २ शाळांवर गुन्हे दाखल
By नारायण बडगुजर | Published: July 16, 2024 03:52 PM2024-07-16T15:52:31+5:302024-07-16T15:53:16+5:30
पालकांना शाळा अधिकृत असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली
पिंपरी : शहरातील अनधिकृत शाळांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवड येथील चिंचवडेनगरमधील लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि चिंचवड येथील लिंक रस्त्यावरील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल केला.
पहिल्या गुन्ह्यात लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे श्रेयशकुमार (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३) अन्वये याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे जे डीकोस्टा (रा. बंगलोर) आणि समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३ (५) अन्वये गुन्हा नोंद केला. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये विलास दयाराम पाटील (५१, रा. नवी सांगवी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ पासून संशयितांनी शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पूर्तता न करता लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळा सुरू ठेवल्या. तसेच शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केली.