देशात परिस्थिती भयंकर; हुकूमशाही येण्याची वाटचाल - आनंदराज आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:57 PM2023-02-22T14:57:39+5:302023-02-22T14:57:56+5:30
महाविकास आघाडीला पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत चर्चा सुरू
पिंपरी : एकीकडे जातीवादी पक्ष आणि दुसरीकडे सर्वांना घेऊन जाणारे मविआ पक्ष अशी लढत चिंचवड आणि कसब्यात आहे. त्यामुळे या दोन्हीही उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे. त्याचे कारण असे की देशामधील परिस्थिती भयंकर आहे. निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणा हाताशी धरून भाजप काम करत आहे. ही देशामध्ये हुकूमशाही येण्याची वाटचाल आहे, अशी टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली. चिंचवड पोटनिवडणूकीसाठीमहाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना आनंदराज आंबेडकर यांनी पाठींबा दिला आहे. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, समविचारी पक्ष एकत्र येणे आवश्यक आहे. वंचितची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती आहे. तरीही त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र भविष्यात देखील आम्ही मविआसोबत राहण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. पुढे सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे लागेल. अन्यथा भाजप सर्वांची अवस्था शिवसेनेसारखी करेल असेही आंबेडकर यांनी सांगितले.