Pimpri Chinchwad: पिंपरी गावातील मंडळाच्या मिरवणुकीत ढोल पथकांचा दणदणाट
By नारायण बडगुजर | Published: September 28, 2023 01:30 PM2023-09-28T13:30:37+5:302023-09-28T13:30:57+5:30
घाटांवर वैद्यकीय पथक तैनात...
पिंपरी : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी गावात दुपारी बारा नंतर मिरवणुकांना सुरुवात झाली. नवसाचा महागणपती असलेल्या मित्र सहकार्य तरुण मंडळाने लक्ष वेधून घेतले. मंडळाने साकारलेली विठ्ठलाची भव्य मूर्ती आणि ढोलपथक आकर्षण आहे. तसेच दुपारी एक पर्यंत घरगुती गणेश भक्त मोठ्या संख्येने घराबाहेर पडले.
पिंपरी येथे सुभाष नगर येथील झुलेलाल घाट आणि पिंपरी गावातील घाट येथे महापालिकेतर्फे विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पिंपरी गावात माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी देखील विसर्जनासाठी दोन हौद तयार केले आहेत. त्याचप्रमाणे वैभवनगर येथे देखील विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पवना नदीवरील घाटावर घरगुती गणपतीच्या मूर्तींचे दुपारी एक वाजता पर्यंत विसर्जन करण्यात आले. तसेच महापालिकेच्या पिंपरी गावातील घाटावर दुपारी एक पर्यंत वीस मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेतर्फे घाटांवर जीव रक्षक व सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आले आहे. नदीपात्रात विसर्जनास मनाई केल्याने सर्व मूर्तींचे हौदामध्ये विसर्जन केले जात आहे.
घरगुती बाप्पाला निरोप देताना अबालवृद्धांकडून गणरायाचा जयघोष केला जात आहे. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.
घाटांवर वैद्यकीय पथक तैनात
विसर्जन घाटांवर महापालिकेकडून वैद्यकीय पथक नियुक्त केले आहे. तसेच रुग्णवाहिका दिली आहे. घाटावरील कर्मचारी व गणेश भक्त यांची आवश्यकतेनुसार उच्च रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी करून घेण्यात येत आहे. तसेच प्रथमोपचार सुविधा देखील उपलब्ध आहे.
शगुन चौकात स्वागत कक्ष
महापालिकेकडून पिंपरीतील शगुन चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. येथे मंडळाचे स्वागत केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून टेहळणी मनोरे देखील उभारले आहेत.