लोकमतच्या वृत्त मालिकेचे यश! नाट्यगृहांचे भाडे पूर्वीप्रमाणे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
By विश्वास मोरे | Published: January 6, 2024 04:28 PM2024-01-06T16:28:20+5:302024-01-06T16:33:22+5:30
प्रशासकीय राजवटीत कलांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे याविषयीची वृत्तमालिका लोकमतने केली होती....
पिंपरी : शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने लोकमतने पिंपरी चिंचवड शहरातील नाट्यगृह भाडेवाडीचा मुद्दा लावून धरला होता. वृत्तमालिका केली होती. 'मुख्यमंत्री साहेब नाटक करायचं कसं? असा प्रश्न उपस्थित केला होता. आज नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर प्रशांत दामले यांनी थेटपणे नाट्यगृहांच्या भाडेवाढ बद्दल नाराजी व्यक्त केली. आमदार उमा खापरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. नंतर व्यासपीठावरच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाने केलेली दरवाढ नाट्यगृहांची दरवाढ मागे घ्यावी. पूर्व पूर्वीप्रमाणे भाडे ठेवावे, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका परिसरामध्ये प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड, आचार्य अत्रे मंदिर पिंपरी, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह प्राधिकरण, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, अशी पाच नाट्यगृह आहेत.
लोकमतच्या प्रयत्नांना यश!
प्रशासकीय राजवटीत कलांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे याविषयीची वृत्तमालिका लोकमतने केली होती. त्यातून महापालिकेच्या वतीने केलेली चारपट भाडेवाढ, संगीत रंगभूमीची ५० टक्के भाडे सवलतीची योजना रद्द, सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमासाठी व्यावसायिक दराने भाडेवाढ याविषयी आवाज उठवला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने ५० टक्के दरवाढ मागे घेतली होती. मात्र, शंभर टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी विविध संस्थांच्या वतीने करण्यात येत होती. तसेच दरवाढीबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने पिंपरी चिंचवड शहरात नाटक सादर करणार नाही अशी भूमिका घेऊन बहिष्कार टाकला होता. याबाबतचा आवाज लोकमतने उठवला होता. तसेच मुख्यमंत्री पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर येणार असल्याने लोकमतने 'मुख्यमंत्री साहेब नाटक सादर करायचं कसं?' असा प्रश्न उपस्थित केला होता.
नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच प्रशांत दामले यांनी नाट्यगृहांच्या भाडेवाढ बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ही मोठी दरवाढ असल्याचे मुख्यमंत्र्यांना जाहीर भाषणातून सांगितले. तर आमदार उमा खापरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट आपल्या भाषणामध्ये नाट्यगृह दरवाढबाबत नाराजी व्यक्त केली. ही दरवाढ रद्द करावी. पूर्ववत भाडे आकारणी करावी असे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले.
याकडेही वेधले होते लक्ष!
कोणताही ना अभ्यास न करता तसेच नाट्यकलाक्षेत्रातील मान्यवरांचे मत विचार न घेताच महापालिका प्रशासनाच्या वतीने भाडेवाढ करण्यात आली होती. यास खासदार श्रीरंग बारणे, नाट्य परिषद अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले, कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे, नादब्रह्म परिवाराचे डॉ रवींद्र वंदना गांगुर्डे, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन अशा विविध संस्थांनी दरवाढ रद्द करावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्याबाबत प्रशासन भाडेवाढ मागे न घेण्यावर ठाम होते.