बांधकाम निकृष्ट दर्जाचे हे माहित असूनही टाकीत पाणी भरले; ५ कामगारांच्या मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: October 24, 2024 06:13 PM2024-10-24T18:13:50+5:302024-10-24T18:14:24+5:30
टाकीच्या नळांवरून पाणी भरून घेण्याची लगबग सुरु असताना सकाळी ६ च्या सुमारास टाकी फुटली, यात टाकीची भिंत पडून ५ जणांचा मृत्यू तर ७ कामगार जखमी झाले
पिंपरी : लेबर कॅम्पमधील पाण्याची टाकी पडून पाच कामगारांचा मृत्यू झाला. तसेच सात कामगार जखमी झाले. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे सद्गुरु नगरमध्ये गुरुवारी (दि. २४) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी औद्याेगिक कामगार पुरवठा ठेकेदाराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
माल्ला महाकुर (४८), नवीन जोन्ना (४९), सुदाम बेहरा (३२, तिघेही रा. ओडिसा), सोनूकुमार कुलदीप पासवान (२३, रा. झारखंड), रवींद्रकुमार जयप्रकाश मंडल (२०, रा. बिहार), असे मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. संतोषकुमार रामनरेश सहानी, शिवजतन निशाद, मुन्ना रमेश चौधरी, महंमद सलीम मंगरु शेख, जितेंद्रकुमार मंडल, महंमद हरुण रशिद, अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. संतोषकुमार रामनरेश सहानी (३५, सध्या रा. लेबर कॅम्प, सद्गुरुनगर, भोसरी, मूळगाव मिर्झापूर, उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. औद्याेगिक कामगार पुरवठा ठेकेदार कुमार लोमटे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
भोसरी येथील सद्गुरुनगर येथे रेड झोन हद्दीत लेबर कॅम्प उभारला आहे. येथे ४० खोल्यांमध्ये हजारावर कामगार वास्तव्यास आहेत. खोल्यांजवळ कामगारांसाठी १२ फूट उंच पाण्याची टाकी उभारण्यात आली. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून कामगारांनी टाकीजवळ अंघोळीसाठी गर्दी केली. टाकीच्या नळांवरून पाणी भरून घेण्याची लगबग सुरू होती. त्यावेळी सव्वासहाच्या सुमारास टाकी फुटली. यात कामगारांच्या अंगावर टाकीची भिंत पडून ते जखमी झाले. यात पाच कामगारांचा मृत्यू झाला. तर सात कामगार जखमी झाले.
दरम्यान, टाकी पडल्याच्या आवाजामुळे कामगारांचा गोंधळ उडाला. त्यांची पळापळ सुरू झाली. तसेच परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
निकृष्ट बांधकाम
कुमार लोमटे याने एक आठवड्यापूर्वी पाण्याची टाकी बांधली. मात्र, कुशल कामगाराकडून टाकीचे बांधकाम करून घेतले नाही. तसेच बांधकाम निकृष्ट दर्जाचे व कच्चे आहे हे माहिती असताना टाकीमध्ये पाणी भरून निष्काळजीपणे वापरात आणली. ती टाकी फुटून त्याची भिंत कामगारांच्या अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. तसेच काही कामगार जखमी झाले, असे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नोंद केली आहे.