इंजिनियर पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेची सहाव्या मजल्यावरून उडी
By नारायण बडगुजर | Published: September 17, 2023 03:10 PM2023-09-17T15:10:39+5:302023-09-17T15:10:58+5:30
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीवर गुन्हा दाखल
पिंपरी : पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीवर गुन्हा दाखल केला. भोइरवाडी, माणगाव येथे गुरुवारी (दि. १४) रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली.
पुजा कुमारी (२८), असे शिक्षिकेचे नाव आहे. रामधनी प्रसाद (६२, रा. झारखंड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश कुमार (रा. भोईरवाडी, माणगाव, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामधनी यांची मुलगी पुजा कुमारी ही खासगी शाळेत शिक्षिका होती. तिचा पती प्रकाश कुमार हा इंजिनियर असून खासगी आयटी कंपनीत नोकरीला आहे.
पुजा कुमारी हिला नोकरी करण्याची इच्छा असताना तिला पती प्रकाश याने जाणीवपूर्वक नोकरी सोडण्यास भाग पाडले. पुजा कुमारी नोकरी करीत असताना पती प्रकाश तिला नोकरीच्या वेळेत घरातील कामे सांगत असे. तिला व्यस्त ठेवून नोकरीवर जाण्यास अडवणूक करत असे. तिला मानसिक त्रास देऊन घालून पाडून बोलून पगारावरून अपमानित करत असे. या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घराच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले.
पुजा कुमारी ही पती प्रकाश कुमार याच्या त्रासाला कंटाळली होती. प्रकाश कुमार याने तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे रामधनी प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.