Video: शिक्षकांची कमाल अन् मुलांची धमाल; गाण्यांच्या चालीवर शिकवतायेत गणिताचे फॉर्म्युले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 01:09 PM2023-04-28T13:09:31+5:302023-04-28T13:10:48+5:30
शिक्षकाने बॉलिवूड साँग, रॅप साँगच्या चालीवर तब्बल १ हजार ८० फॉर्म्युले बसवले
ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : गणित म्हटले तरी अनेकांना शाळा-कॉलेज नको वाटते; परंतु हाच गणिताचा विषय खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अत्यंत सोपा केला आहे. कॉलेजमधील मुले, मुली हसत-खेळत आणि विशेष म्हणजे गात गणिताची सूत्रे (फॉर्म्युले) पाठ करत आहेत. हिंदी गाणे, रॅप साँग, लावणी, लोकगीतांच्या चालींवर गणिताच्या सूत्रांची मांडणी केल्याने विद्यार्थ्यांचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अत्यंत अभिनव पद्धतीने गणिताची सूत्रे मांडणाऱ्या या शिक्षकाचे नाव अभिजित भांडारकर असे आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डीत अनोख्या पद्धतीने गणिताची सूत्रे (फॉर्म्युले) शिकवली जात आहेत. बॉलिवूड साँग, रॅप साँगच्या चालीवर १ हजार ८० फॉर्म्युले बसविण्यात आले आहेत. ते मुलांच्या डोक्यात अगदी फिट्ट राहतात. बहुतांश मुलांना गणित विषय म्हटले तरी ताण यायचा, पण आता हीच मुले मोठ्या आवडीने गणित शिकत आहेत, अशी माहिती अभिजित भांडारकर यांनी दिली.
गणितात सहावेळा नापास...
भांडारकर यांच्या या शिक्षण पद्धतीची दखल ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. गाण्यांच्या चालींवर मांडणी करून ‘फॉर्म्युले’ बनविण्याची एक रंजक गोष्ट आहे. अभिजित भांडारकर हे गणित विषयात सहावेळा नापास झाले होते म्हणून त्यांनी आपल्यावर जी परिस्थिती ओढावली ती इतर मुलांवर येऊ नये म्हणून शिक्षण पूर्ण करून अनोख्या पद्धतीने गणिताचे फॉर्म्युले मांडले.
अनेकांनी काढले वेड्यात...
२००७ मध्ये अवघ्या दोन मुलांसह त्यांनी खासगी शिकवणीची सुरुवात केली. बॉलिवूड साँग आणि रॅप साँगवर ते गणिताचे ‘फॉर्म्युले’ म्हणायचे. अगोदर त्यांना अनेकांनी वेड्यात काढले, टिंगलटवाळी केली; पण आज ५०० पेक्षा अधिक मुले-मुली त्यांच्याकडून अनोख्या शिक्षणपद्धतीचे धडे घेत आहेत.
''गणित विषय हा खूप कंटाळवाणा. मला तो विषय अजिबात आवडत नाही, असे म्हणणारी मुले, मुली आवर्जून आणि काही तास क्लास करून गणिताचे फॉर्म्युले पाठ करत आहेत. कॉलेजमध्ये कंटाळवाणा वाटणारा गणित विषय आता मुलांना आवडू लागला आहे. काठावर पास होणारी मुले ८० टक्क्यांच्या पुढे गुण घेत आहेत. - अभिजित भांडारकर, शिक्षक''
पिंपरीतील शिक्षकांची कमाल अन् मुलांची धमाल; गाण्यांच्या चालीवर शिकवतायेत गणिताचे फॉर्म्युले#pune#educationpic.twitter.com/GWv9b3smzy
— Lokmat (@lokmat) April 28, 2023