थेरगाव क्वीनने खोडसाळपणा करत थेट पोलिसांनाच दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:12 PM2022-02-07T16:12:05+5:302022-02-07T16:36:28+5:30
सोशल मीडियावर अकाउंट बनवणाऱ्याचा शोध सुरू
पिंपरी : धमकीवजा तसेच अश्लील भाषेचा वापर करून तयार केलेले व्हिडिओ व्हायरल करून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’वर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर ‘थेरगाव क्वीन’चा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यातून थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
लाईक, शेअर आणि फालोअर्सच्या नादात काही जण सोशल मीडियावर व्हिडिओ करीत असतात. अशाच प्रकारे थेरगाव येथील एका तरुणीने धमकीवजा तसेच अश्लील भाषेचा वापर करून तयार केलेल व्हिडिओ व्हायरल केले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी ‘थेरगाव क्वीन’ला अटक केली होती. तसेच तिच्या साथीदार ‘भाई’ला पुणे येथून बेड्या ठोकल्या. यापुढे असे व्हिडिओ करणार नाही, असे म्हणत त्या ‘भाई’ने माफी मागितली.
‘थेरगाव क्वीन’ला सोशल मीडियात मोठ्या संख्येने ‘फालोअर्स’ आहेत. त्यामुळे कोणीतरी ‘थेरगाव क्वीन-९’ नावाने अकाउंट तयार केल्याचे समोर आले आहे. या अकाउंटवरून ‘थेरगाव क्वीन’ असलेल्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या तरुणीला वाकड पोलिसांनी अटक केली तेव्हाचा हा व्हिडिओ असून त्यातून पोलिसांना खुले आव्हान देण्यात आले आहे.
मोठी हस्ती आहे आपण, टिपाट थोडीच आहे... ढगात आहे ना आपण, खालनं कितीपण दगडं मारू द्या, आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कुणाची दगडं, असे ‘डायलाॅग’ या व्हिडिओत आहेत. अख्ख्या ब्रह्मांडाला शनी बनून एकटा मी बास होतो, आमच्याबरोबर भांडल्याने चांगल्याचा नास होतो, निंद हराम करतो, असे गाणे या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला आहे.
पोलीस म्हणतात, हा खोडसाळपणा...
इन्स्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन - ९’ या नावाने कोणीतरी अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटवरून संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खोडसाळपणाचा हा प्रकार आहे. संबंधित अकाउंट तयार करणाऱ्याचा शोध सुरू आहे, असे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर यांनी सांगितले.