पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकला गती मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:39 IST2024-12-20T11:38:26+5:302024-12-20T11:39:29+5:30
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घेणार राज्य सरकारसोबत बैठक

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकला गती मिळणार
पिंपरी : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत आणि अन्य विषयांसंदर्भात बैठक होणार आहे. रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील ट्रॅकला आता गती मिळणार आहे. लोणावळा आणि कर्जतमधील घाटक्षेत्रात बोगदा निर्माण करणे, सह्याद्री एक्सप्रेस सुरू करणे, तिला देहूरोड येथे थांबा देणे, पुणे-जोधपूर रेल्वे दररोज सुरू करणे आणि चिंचवड स्टेशनवर थांबा देणे, अशा मागण्या आहेत.
रेल्वेमंत्री वैष्णव यांची खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट घेतली. मावळ मतदारसंघामधील विविध प्रश्नांवर चर्चा केली. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. पुणे ते लोणावळा या लोकलमधून दररोज एक लाख नागरिक प्रवास करत आहेत. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील रेल्वेगाड्या दोन ट्रॅकवरून धावत आहेत.
सात वर्षे काम सुरू नाही
या मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी २०१७ मध्ये मान्यता दिली आहे. याबाबतचे सर्वेक्षणही झाले आहे. ट्रॅक उभारण्यासाठी रेल्वे विभागाकडे जमीनही उपलब्ध आहे; परंतु सात वर्षे काम सुरू झालेले नाही. ट्रॅकचे काम झाल्यानंतर लोकल आणि एक्सप्रेसही धावतील. पुणे ते मुंबई असा दररोजचा प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम तत्काळ सुरू करावे, यासंदर्भात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, अशीही मागणी झाली.
घाटक्षेत्रात बोगदा निर्माण करा
पुणे आणि मुंबईदरम्यान दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. लोणावळा आणि कर्जतदरम्यान रेल्वेगाडी चालण्यासाठी दोन इंजिनचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे येथे बोगद्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात येथून लांबपल्ल्याच्या, एक्सप्रेस आणि लोकलही धावू शकतील.
कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करा
कोरोना काळात बंद केलेल्या अनेक रेल्वेगाड्या पुन्हा सुरू केल्या. सह्याद्री एक्सप्रेस सुरू करावी, देहूरोड स्थानक येथे थांबा द्यावा, पुणे-जोधपूर या सात दिवसांनी धावणारी रेल्वे दररोज सुरू करावी, अशी मागणी आहे.