मुख्यमंत्र्यांचा दौरा आला अन् पिंपरी चिंचवडचे खड्डे बुजवायला मुहूर्त सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 03:29 PM2022-09-22T15:29:28+5:302022-09-22T15:29:44+5:30
पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय
पिंपरी : पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. शहरातील खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहेत. मात्र, शहरातील उपनगर आणि मुख्य रस्त्यांवरील खड्डयांमधून प्रवास करावा लागत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे चिंचवड परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बजुविण्यास मुहूर्त सापडला आहे. काल सायंकाळपर्यंत खड्डे बुजविण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. नव्याने तयार केलेले डांबरी रस्ते अक्षरश: वाहून गेल्याचे दिसून आले आहे. खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत असले तरी वास्तव निराळेच आहे. उपनगरातील रस्ते दयनीय आहेत.
मुख्यमंत्री शिंदे हे पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात सकाळी कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे चिंचवड स्टेशन ते नाट्यगृहे आणि नाट्यगृहे ते चिंचवड गावात आणि पुण्याला जाण्याच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम केले जात होते. काही ठिकाणी डांबर टाकून तर काही ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक टाकून खडडे बुजविण्याचे काम सुरू होते.
खड्ड्यांच्या दुरुस्तीवर प्रशासनाने लाखो रुपये खर्च करीत आहेत. आता पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे पडलेले रस्ते बनवणारे ठेकेदार, अधिकारी, सल्लागार व गुणवत्ता नियंत्रण एजन्सी यांच्या संगनमताच्या भ्रष्टाचारामुळेच शहरवासीयांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेत त्या रस्त्यांच्या कामाची आपण चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
''मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. म्हणून महापालिकेने खड्डे बुजविले असतील, तर चुकीची बाब आहे. शहरातील सर्वच खड्डे बुजवायला हवेत. आणि मंत्री येणार असतील आणि खड्डे बुजविले जाणार असतील तर शहरात दौरे व्हायला हवेत. - मारूती भापकर (सामाजिक कार्यकर्ते )''
खड्ड्यांची आकडेवारी
एकूण खड्डे - ८४६
डांबराने भरले खड्डे - २३८
बीबीएमने भरले खड्डे - ५३
डब्ल्यूएमएमने भरले खड्डे - ३९७
पेव्हिंग ब्लॉगने भरले खड्डे - ३२
खडीमुरुमने भरले खड्डे - १२६