विधवा महिलेनं आयोजित केला हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम; वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा काढली मोडून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:53 PM2022-02-10T16:53:12+5:302022-02-10T18:07:43+5:30
समाजातील परंपरागत चालत आलेल्या विचारांना मागे टाकत पिंपरीतील एका विधवा महिलेने एक वेगळाच आदर्श समाजासमोर आणून ठेवला
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : प्रीती दीपक आगळे...कोरोना काळात त्यांचे पती गेले आणि नऊ महिन्यांच्या बाळाची, कुटुंबाची जबाबदारी अनपेक्षितपणे त्यांच्यावर आली. विधवा महिलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बऱ्याचदा विचित्र असतोच; पण स्त्रिया बऱ्याचदा विचारांची गुंतागुंत करून स्वत:वर बंधने घालून घेतात. विधवा महिलांना आनंदाने जगण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न स्वत:लाच विचारत प्रीती आगळे यांनी नुकताच हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. मैत्रिणींना सुंदर मेसेज पाठवला आणि त्यांच्या कृतीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सुवासिनी आणि विधवा महिलाही आवर्जून हळदी-कुंकवाला आल्या. ‘आपण स्वत:च स्वत:साठी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, जग आपल्याला नक्की साथ देईल. माझ्या कृतीमुळे काही विधवा महिलांमधील न्यूनगंड दूर झाला तरी मला आनंद होईल’, अशा भावना प्रीती यांनी व्यक्त केल्या.
प्रीती म्हणाल्या, ‘गेल्यावर्षी मे महिन्यात पतीचे निधन झाले आणि मी खूप एकटी पडले. त्यांच्या पश्चात आयुष्य जगायचं की फक्त व्यतीत करायचं, पतीशिवाय आपले कसे होणार, असे अनेक प्रश्न पडायला लागले. हळूहळू मनातील गुंता माझा मीच सोडवायला सुरुवात केली. पती हयात असताना आपण जसे जगलो, तसेच जगायचे, ते कुठेही असले तरी त्यांना आपण दु:खात जगलेले आवडणार नाही, ही खूणगाठ मनात पक्की झाली आणि हळदी-कुंकू करण्याचे ठरवले. सासू, नणंद, आईला याची कल्पना दिली. कोणीही मला टोचून बोलले नाही, आनंदाने माझी कल्पना उचलून धरली. मी जोमाने कामाला लागले आणि तयारी सुरू केली.’ पहिले हळदी-कुंकू देण्याचा मान त्यांनी आईलाच दिला. असा कार्यक्रम समाजाच्या विचारांना नवी दृष्टी देणारा ठरला आहे.
प्रीती यांनी पाठवलेले आमंत्रण
‘माझ्यासारख्या वैधव्य आलेल्या स्त्रियांनी हळदी-कुंकू करणे जरा नवलच वाटतं, वैधव्य कुणालाच स्वत:हून नको असतं. ते पदरी पडतं आपली इच्छा नसताना. मग आयुष्य थांबतं का? तर नाही. मग इच्छा मारून का जगायचं? कारण प्रत्येक स्त्रीचा मानाने आणि आनंदाने जगणे हा हक्क आहे. म्हणून मी सुहासिनी आणि विधवा असा भेदभाव न करता, एक नवीन दृष्टिकोन समोर ठेवून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजिला आहे. हा माझा एक प्रयत्न आहे आनंदाने जगण्याचा, तरी त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ व प्रेम असणे गरजेचे आहे.’