कासारसाई धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला
By नारायण बडगुजर | Published: April 23, 2024 05:30 PM2024-04-23T17:30:40+5:302024-04-23T17:32:35+5:30
सोमवारी तरुण धरणात बुडाला, सायंकाळपर्यँत सापडला नव्हता, मंगळवारी सकाळी तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला
पिंपरी : मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात सोमवारी (दि. २२) दुपारी पोहायला गेलेला तरुण बुडाला. त्याचा मृतदेह मंगळवारी (दि. २३) सकाळी मिळून आला.
माधव हरगौरी सिंग (१७, रा. नाशिक एमआयडीसी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. माधव सोमवारी दुपारी कासारसाई धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. सोमवारी सायंकाळी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ या संस्थेचे सदस्यांनी शोधकार्य सुरू केले. मात्र सायंकाळी अंधार झाल्याने शोधकार्य थांबवले. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास माधव याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नीलेश गराडे, अनिल आंद्रे, विनय सावंत, शुभम काकडे, आवी कारले, प्रथमेश सुपेकर, रमेश कुंभार, कुणाल दाभाडे, वैभव वाघ यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.