देहूत बोट क्लबच्या तरूणांनी वाचविले दोन विद्यार्थ्यांचे जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 05:08 PM2023-09-30T17:08:54+5:302023-09-30T17:09:18+5:30
वाचविल्यानंतर या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे....
देहूगाव (पुणे) : येथील इंद्रायणी नदी पात्रात शनिवारी( दि. ३०) दुपारी सव्वा एकच्या सुमारास बुडणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना गजराज बोटिंग क्लबच्या दोन तरूणांनी प्राण वाचविले. वाचविल्यानंतर या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे.
येथे देहूतील संत तुकाराम विद्यालयाच्या वतीने पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 वी जयंती निमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ संपल्यानंतर विद्यालयातील इयत्ता नववीत शिकत असलेले लोकेश भूल, देवकुमार शाहू, तुषार शिंदे, अख्तर मुस्तफा रज्जाक (वय १६ सर्व रा. विठ्ठलवाडी, देहू ) आणि विक्रम उदयशंकर सिंग (वय १३ रा. येलवाड़ी) असे पाच जण इंद्रायणी नदी घाटावर पोहण्यासाठी गेले होते. सध्या इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. असे असतानाही यापैकी विक्रम सिंग आणि अख्तर रज्जाक यांना पोहता येत नसतानाही पाण्यात पोहण्यास उतरले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात खेचले गेले आणि बुडू लागले.
नुकत्याच सुरू असलेल्या पावसामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढलेली असून पाण्याचा प्रवाह जोरात आहे. बुडणाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी ओरडाओरड केले असता लगतच असणाऱ्या गजानन काळोखे यांच्या गजराज बोटिंग क्लबवरील रमेश पवार आणि देवेंद्र गाडे यांनी तातडीने बोट बुडणाऱ्या दोघांजवळ घेऊन त्यांनी या दोघांचे जीव वाचविले. दोघांना बोटीत घेऊन किनाऱ्यावर आणले. दोघांकडून त्यांच्या पालकांची माहिती घेऊन त्यांना बोलावून पालकांच्या स्वाधीन केले. गजराज बोट क्लबच्या चालक गजानन काळोखे व कर्मचाऱ्यांनी आत्ता पर्यत अनेकांचे जीव वाचविले असून आज दोघांचे जीव वाचविल्याने त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
सोबत फोटो पाठवित आहे.