पैशाच्या अमिषापोटी तरुण चांगलाच फसला; व्हिडीओचा एक लाईक १२ लाखाला पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 08:15 PM2023-01-18T20:15:57+5:302023-01-18T20:23:45+5:30
व्हिडीओला लाईक केले म्हणून रिफंड ५० रुपये मिळत होते
पिंपरी : व्हिडीओला लाईक केले म्हणून रिफंड म्हणून ५० रुपये मिळाले. तब्बल १६ वेळा असे रिफंड म्हणून नऊ हजार रुपये मिळाले. त्यामुळे या टास्कमध्ये पैसे गुंतवले तर रक्कमेचा चांगला रिफंड आणि बोनस देखील मिळेल, असे आश्वासन मिळाल्याने एक जणाने अवघ्या एका दिवसात तब्बल १२ लाख २३ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, या गुंतवणूकीनंतर संबंधिताने टेलिग्राम ग्रुपच डिलीट करून गुंतवणूक केलेल्या पैशाचा परतावा न देता फसवणूक केली. ही घटना शनिवारी (दि.१४) सायंकाळी साडेपाच ते रविवारी (दि.१५) आठच्या सुमारास हिंजवडी येथे घडली. या प्रकरणी रवी शंकर सोनकुशेर (वय ४३, रा. हिंजवडी) यांनी मंगळवारी (दि.१७) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हॉट्सअपवर एक लिंक आली होती. त्यालिंकवर फिर्यादी यांनी रजिस्टेशन केले होते. त्यानंतर फिर्यादीला व्हिडीओ पाठवण्यात आले. फिर्यादीने व्हिडीओला लाईक केला असता त्यांना रिफंड म्हणून ५० रुपये मिळाले. फिर्यादीला तब्बल १६ वेळा रिफंड मिळाल्याने त्यामुळे यामध्ये फिर्यादीने या टास्कमध्ये १२ लाख २३ हजार ५०० रुपये अवघ्या एका दिवसांत गुंतवले आणि रिफंड व बोनसबाबत विचारले. मात्र, टेलग्रामवरील ग्रुपच संबंधिताने डिलीट करून बंद केला. आणि फिर्यादी यांनी दिलेल्या पैशाचा अपहार करत फसवणूक केली.