पुन्हा ‘तीन पैशांचा तमाशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:02 AM2018-06-12T03:02:56+5:302018-06-12T03:02:56+5:30

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले अजरामर नाटक म्हणजे ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक रंगमंचावर सादर करण्याचे स्वप्न अनेक कलाकारांनी उराशी बाळगले...

'theen Paishancha Tamasha' Against | पुन्हा ‘तीन पैशांचा तमाशा’

पुन्हा ‘तीन पैशांचा तमाशा’

Next

पुणे  - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले अजरामर नाटक म्हणजे ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक रंगमंचावर सादर करण्याचे स्वप्न अनेक कलाकारांनी उराशी बाळगले...त्यातील काही जणांना प्रत्यक्षात ते रंगमंचावर साकारण्याची संधीही मिळाली...पण आता हे नाटक पुन्हा रंगमंचावर साकार होत आहे, ते काही दिव्यांग कलाकारांच्या अभिनयातून. तब्बल २२ कलाकार हे नाटक घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. सध्या या नाटकाच्या रंगीत तालमी सुरू असून, लवकरच ते रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
पुलंचा मंगळवारी (दि. १२) स्मृतिदिन. येत्या नोव्हेंबरमध्ये पुलंचे जन्मशताब्दीवर्षही सुरू होत आहे. याचे औचित्य साधून रश्मी पांढरे आणि वीणा ढोले यांच्या आरलीन संस्थेने ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणत आहेत.
पु. लं.नी विसाव्या शतकातला श्रेष्ठ जर्मन नाटककार, दिग्दर्शक, संगीतज्ञ, कवी आणि तत्त्वचिंतक बटरेल्ट ब्रेश्ट याच्या ‘द थ्री पेनी आॅपेरा’ या मूळ जर्मन नाटकाचं केलेलं स्वैर रूपांतर म्हणजे ‘तीन पैशांचा तमाशा’ हे नाटक. अगदी गण-गवळणपासून ते तमाशापर्यंतच्या लोककलांचा स्पर्श करीत पुलंनी हे नाटक रंगमंचावर आणले. पुलंनंतर थिएटर अ‍ॅकॅडमीने पुलंच्या ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटकाचा पहिला प्रयोग २५ जून १९७८ रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केला होता. डॉ. जब्बार पटेल यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर २००० मध्ये स्वागत थोरात यांनी ‘यशोगाथा’ संस्थेतर्फे हे नाटक रंगमंचावर आणले होते. त्यामध्ये ४४ दृष्टिहीन कलाकारांनी काम केले होते. आता ‘तीन पैशाचा तमाशा’ तिसऱ्यांदा रंगमंचावर सादर होणार असून यामध्येही दृष्टिहीन कलाकारांचा सहभाग आहे.
नाटकाच्या तालमीमध्ये गौरव घायले, अद्वैत मराठे, विकी शेट्टी, सुंदर सोंडस, प्रवीण पाखरे, सौरभ चौगुले, प्रवीण पालके, संतोष कसबे, राम भोईटे, फईम तांबोळी, स्वप्नील पाटील, रामकृष्ण घुले, रूपाली यादव, तेजस्विनी भालेकर, मेघा पाटील, आरती ढगे, शीतल चव्हाण, बेला सोंडे, प्राजक्ता डफळ, हेमांगी धामणे असे दृष्टिहीन कलाकार सहभागी झाले आहेत. तांत्रिक बाजू सचिन ठाकूर, प्रशांत कांबळे, ऋचा पाटील, वृषाली बोरावके हे सांभाळत असून, वनिता देशपांडे कार्यकारी निर्मात्या म्हणून काम करत आहेत.

स्वागत थोरातांवर दिग्दर्शनाची जबाबदारी
रश्मी पांढरे आणि वीणा ढोले यांच्या आरलीन संस्थेला त्यासाठी त्यांना ‘साबी फाउंडेशन’ या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. या निर्मात्याद्वयींनी यापूर्वी गणेश दिघे यांच्या ‘अपूर्व मेघदूत’ या १९ दृष्टिहीन कलाकारांच्या भूमिका असलेल्या नाटकाची निर्मिती केली होती. ‘अपूर्व मेघदूत’चे दिग्दर्शन करणारे स्वागत थोरात यांनी ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
नाटकामध्ये बारा गाणी
या नाटकामध्ये बारा गाणी असून बिपीन वर्तक यांनी संगीत दिले आहे. अरविंद हसबनीस यांनी संगीत संयोजन केले आहे. राधा मंगेशकर, शरयू दाते, शंतनू हेर्लेकर, बिपीन वर्तक आणि अरविंद हसबनीस यांच्या आवाजात ही गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. २४ जून रोजी या नाटकातील गाण्यांच्या सीडीचे प्रकाशन होणार असल्याची माहिती रश्मी पांढरे यांनी दिली.

Web Title: 'theen Paishancha Tamasha' Against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.