कोयत्याचा धाक दाखवून चोरी; वाहनांची तोडफोड; चिंचवडमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 16:47 IST2021-06-14T16:46:35+5:302021-06-14T16:47:18+5:30
रविवारी रात्री आरोपी हातात कोयते घेऊन आरडाओरडा करत फिर्यादी यांच्या घराजवळ आले..

कोयत्याचा धाक दाखवून चोरी; वाहनांची तोडफोड; चिंचवडमधील घटना
पिंपरी : चिंचवडमधील पत्राशेड झोपडपट्टी, लिंक रोड येथे कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत एकाच्या खिशातील रोकड चोरल्याची घटना घडली. रविवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी हातात कोयते घेऊन आरडाओरडा करत फिर्यादी यांच्या घराजवळ आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत कोयत्याचा
धाक दाखवून वडिलांच्या खिशातून ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी रिक्षाची तोडफोड केली. आरोपींनी हवेत कोयते फिरवत दहशत पसरवून निघून गेले. फिर्यादी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असताना लिंक रोडवरील पुलाखाली एक लाल रंगाच्या कारची देखील तोडफोड झाल्याचे दिसले. त्या कारचीही आरोपींनी तोडफोड केल्याचे फिर्यादी यांना समजले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
किरण पवार, अविनाश साळवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रोहित ऊर्फ जाड्या साळवे (सर्व रा. पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोमल बाबू खैरारिया (वय २४, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.