माजी राष्ट्रपतींच्या नातेवाईकांच्या घरी चोरी
By admin | Published: July 14, 2017 01:57 PM2017-07-14T13:57:57+5:302017-07-14T13:57:57+5:30
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निगडी येथील नातेवाईकाच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 14 - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निगडी येथील नातेवाईकाच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांत शुक्रवारी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणातील बिजलीनगर कॉर्नर गुरूनाणक ऑटो मोबाइलजवळ पूजा अपार्टमेंटही इमारत आहे.
तिथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नातेवाईक नरेंद्रसिंह एस पाटील (वय ३२)) राहतात. ते गेल्या पंधरा दिवसांपासून काही कामानिमित्त दिल्लीला गेलेले आहेत. चोरट्यांनी घर फोडल्याचे प्रकरण गुरूवारी रात्री उघडकीस आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी पाटील यांच्या घरातून सुमारे अडीच लाख रूपये रोख चोरीला गेले असून घरातील सोन्याचे दागिने किंवा अन्य मुद्देमाल चोरीला गेलेला नाही.
घटनास्थळी श्वान पथकासही पाचारण केले होते. तसेच परिमंडळ उपायुक्त आणि गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याविषयी निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शंकर अवताडे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘संबंधित घर हे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.
तपास सुरू केला आहे. तसेच नातेवाईकांनाही कळविले आहे. घरमालक आल्यानंतर रोख रकमेशिवाय आणखी काही मुद्देमाल चोरीला गेला आहे की नाही. याची माहिती घेण्यात येईल.