दिल्लीतून महागड्या गाड्यांची चोरी अन् पिंपरीत विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 01:00 PM2020-02-12T13:00:45+5:302020-02-12T13:05:37+5:30
आरोपींनी ही वाहने चोरून आणून त्यांच्या चेसी व इंजिन क्रमांकामध्ये फेरफार केल्याचे उघड
पिंपरी : विमा कंपनीच्या वेबसाइटवरून भंगार वाहने ऑनलाइन खरेदी करून त्यांच्या आरटीओ क्रमांकाचा वापर चोरीच्या वाहनांसाठी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही चोरीची महागडी वाहने लाखो रुपयांना विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडून १५ इंजिनसह १२ चारचाकी वाहने, असा दोन कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.
चनप्रित हरविंदरपाल सिंह (वय ४३, रा. रावेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक रस्त्यावर गणेशनगर, रावेत येथे एका पंजाबी व्यक्तीचे गॅरेज आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार २६ जानेवारी रोजी पोलिसांनी गॅरेजवर छापा टाकून आरोपी चनप्रित सिंह याला ताब्यात घेतले. त्यानंतर गॅरेजची पाहणी केली असता, गॅरेजमध्ये दोन चारचाकी वाहने मिळून आले.
तसेच गाड्यांचे सुटे पार्ट व अनेक इंजिन दिसून आले. त्या वाहनांवर महाराष्ट्रातील आरटीओ पासिंगचा क्रमांक होता. परंतु त्याच्या इंजिन क्रमांकावरून ते वाहन पंजाब राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच इतर चारचाकी वाहनांवरील क्रमांकही खोटा असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे आरोपींनी ही वाहने चोरून आणून त्यांच्या चेसी व इंजिन क्रमांकामध्ये फेरफार केल्याचे उघड झाले.
........................
विमा कंपन्यांकडून खरेदी केलेल्या वाहनांच्या नंबरप्लेटचा गैरवापर
आरोपी चनप्रित सिंह व त्याचा साथीदार असे दोघांचे भागीदारीमध्ये रावेत येथे गॅरेज आहे. अपघातामध्ये नुकसान झालेली वाहने भंगारात विकण्यात येतात. संबंधित विमा कंपनीकडून अशी भंगार वाहने त्यांच्या वेबसाइटवरून ऑनलाइन विक्री केली जातात. ही वाहने कागदपत्रांसह आरोपी ऑनलाइन विकत घेत असत. विकत घेतलेल्या गाडीच्या मॉडेलची व रंगाची चारचाकी गाडी पंजाब, हरियाणा, दिल्ली व इतर राज्यांतून चोरी करून आणून त्या गाडीवर अॅक्सिडेन्ट झालेल्या गाडीचा चेसी नंबर असलेला भाग लावून गाडीची पुन्हा विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.