पिंपरीत महापालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये चोरी, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांचे साहित्यच गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:59 PM2021-06-09T15:59:46+5:302021-06-15T17:39:09+5:30

मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त भावनाही नातेवाईकांकडून व्यक्त

theft pimpri municipal corporations covid center | पिंपरीत महापालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये चोरी, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांचे साहित्यच गायब

पिंपरीत महापालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये चोरी, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांचे साहित्यच गायब

Next
ठळक मुद्देसेंटरमध्ये कार्यरत असलेले किंवा तेथे सहज प्रवेश मिळणाऱ्यांनी या साहित्याची चोरी केल्याचा अंदाज

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये चोरीचे प्रकार घडल्याचे समोर आले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांचे मौल्यवान वस्तू, दागिने, रोकड याची चोरी झाल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे रुग्ण व मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त भावनाही नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे ऑटो क्लस्टर व नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. शहर तसेच जिल्ह्यातीलही रुग्ण येथे दाखल करण्यात येत होते. रुग्ण दाखल करून घेताना दागिने, पाकिट, रोकड, मौल्यवान वस्तू त्यांच्या जवळच ठेवण्यात असे. उपचारा दरम्यान रुग्णाची तब्येत खालावल्यास त्याच्याकडील साहित्याची चोरी करण्याचे प्रकार झाले. तसेच उपचारा दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांचे साहित्यही लंपास करण्यात आले. 

कोव्हीड सेंटरमध्ये सामान्य नागरिक तसेच रुग्णाचे नातेवाईक आदींना प्रवेश नसल्याने चोरट्यांचे अधिक फावले. सेंटरमध्ये कार्यरत असलेले किंवा तेथे सहज प्रवेश मिळणाऱ्यांनी या साहित्याची चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

खिशातील पाकिटही गायब

रुग्ण किंवा मृतांच्या खिशातील पाकिटही चोरट्यांनी चोरून नेले. चोरट्यांनी महिला रुग्णांचे सौभाग्याचे लेणे देखील लंपास केले. त्यामुळे इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कोविड सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी पोलिसांनी केली. मात्र केवळ लाइव्ह चित्रण होते, त्याचे रेकॉर्डिंग होत नाही, असे समोर आले. त्यामुळे तपासातील अडचणी वाढल्या आहेत. यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना मदतीसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

"चोरीचा प्रकार घडला असल्यास संबंधित नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी. शहरातील काही महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये  ८०१०४३०००७, ८०१०८१०००७, ८०१०४६००७, ८०१०८३०००७ हे सॅमरिटन हेल्पलाइन क्रमांक आम्ही लावले आहेत. असे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले आहे".  

Web Title: theft pimpri municipal corporations covid center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.