तुळजाभवानी, कान्होबा पाठोपाठ भैरवनाथ मंदिरात चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 01:57 PM2018-12-23T13:57:03+5:302018-12-23T14:00:27+5:30
सांगवी-पिंपळे गुरव येथील तुळजाभवनी मंदिरात अज्ञात चोरट्याने १२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चाेरला.
पिंपरी : सांगवी-पिंपळे गुरव येथील तुळजाभवनी मंदिरात अज्ञात चोरट्याने १२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चाेरला. तर याच परिसरातील स्मशानभूमीजवळ असलेल्या कान्होबा मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी १८ हजारांचा ऐवज लांबविला. शुक्रवारी रात्री दोन मंदिरांत चोरट्यांनी चोरी केल्याच्या घटना ताज्या असताना अज्ञात चोरट्यांनी याच परिसरातील भैरवनाथ मंदिराच्या दानपेटीवरसुद्धा डल्ला मारला. तेथून १२०० रुपयांचा ऐवज पळविला आहे. सांगवी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल श्रीकांत कदम यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. तुळजाभवानी मंदिरात शुक्रवारी झालेल्या चोरीप्रकरणी अक्षय अनिल साळवे (वय २३) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलिसांनी त्यास अटक केली आहे. आरोपीने पितळी दिवा, समई, दहा हजार रुपये किमतीचा एलईडी दूरचित्रवाणी संच चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. त्याच दिवशी दुसरी घटना या परिसरातील कान्होबा मंदिरात घडली. सूर्यकांत ज्ञानोबा देवकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. तांब्या पितळेची भांडी, मूर्ती, दानपेटीतील रोकड तसेच पूजेचे साहित्य असा सुमारे १९ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची पोलिसांकडे नोंद आहे. या दोन घटना ताज्या असताना, याच परिसरातील भैरवनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. दानपेटीतील १२०० रुपयाची रोकडे पळवुन नेल्याची बाब उघडकीस आली आहे. एकाच परिसरात दोन दिवसात मंदिरातील चोरीच्या तीन घटना घडल्या असून सांगवी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.