आदराचे स्थान मिळावे याकरिता ‘त्यांचा’ प्रयत्न, रविवारी येणार तृतीयपंथी एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 02:53 AM2018-11-17T02:53:06+5:302018-11-17T02:54:24+5:30
२० नोव्हेंबर हा दिवस सबंध जगभरात ‘तृतीयपंथी बांधवाची आठवण’ म्हणून साजरा केला जातो.
पुणे : समाजात नेहमीच उपेक्षेची वागणूक मिळणाऱ्या तृतीयपंथीयांना आदराचे स्थान मिळावे, याकरिता रविवारी ‘ट्रान्सजेंडर डे’ निमित्ताने विशेष एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सततच्या अपमानाला तोंड देत खडतर परिस्थितीत संघर्षमय जीवन व्यतीत करून निधन झालेल्या तृतीयपंथीयांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यात शहरातील तृतीयपंथी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक सोनाली दळवी यांनी दिली.
२० नोव्हेंबर हा दिवस सबंध जगभरात ‘तृतीयपंथी बांधवाची आठवण’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने पुण्यातदेखील रविवारी (१८) सायंकाळी सहा वाजता जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मेणबत्या पेटवून तृतीयबांधवांप्रती आदरांजली व्यक्त करण्यात येणार आहे. यात एलजीबीटी समुहाचे ३० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी होणार आहेत. समाजात अद्यापही तृतीयपंथी व्यक्तींप्रती अपमानाची भावना सामान्य नागरिकांमध्ये दिसून येते. इतर व्यक्तींप्रमाणेच आम्हीदेखील आहोत. आम्हाला दूर लोटून सातत्याने दुषणे देवून आमच्या विरोधात नाराजी पसरवली जाते. यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ती भावना कमी होण्यास मदत होईल, असे सोनाली यांनी सांगितले.