...तर वाहने पेटवून देऊ; डेपो परिसरातील नगरसेवक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:26 AM2018-04-21T03:26:27+5:302018-04-21T03:26:27+5:30
महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कच-यातून वीजनिर्मिती अर्थात वेस्ट टू एनर्जीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सत्ताधारी नगरसेवकांनीही या प्रकल्पाबाबत साशंकता व्यक्त केली होती.
पिंपरी : महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कच-यातून वीजनिर्मिती अर्थात वेस्ट टू एनर्जीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सत्ताधारी नगरसेवकांनीही या प्रकल्पाबाबत साशंकता व्यक्त केली होती. प्रशासनाने माहिती का दडवली असा प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प मंजूर न केल्यास वाहने पेटवून देऊ, अशी भूमिका कचरा डेपो परिसरातील नगरसेवकांनी घेतली. साधक,
बाधक चर्चा व प्रशासनाच्या सादरीकरणानंतर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. दोन दिवसांपूर्वी विरोधकांप्रमाणेच भाजपाच्या नगरसेविका माया बारणे यांनी या प्रकल्पासंदर्भात प्रशासनास धारेवर धरले होते. त्यामुळे या प्रकल्पावर गोंधळ होण्याची चिन्हे होती.
सुरुवातीला विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी हा प्रकल्प खरच गरजेचा आहे. पारदर्शक कारभार आहे, मग नगरसेवकांना याचे सादरीकरण का केले नाही, यामागे गौडबंगाल काय? निविदा ही २१ वर्षांसाठी का आहे? काळ्या यादीतील ठेकेदाराला काम कसे दिले, असे प्रश्न केले. त्यास सत्ताधारी पक्षाच्या समाविष्ट गावांतील महिला नगरसेवकांनी या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले. सत्ताधारी काही नगरसेवक आणि विरोधक विरोध करीत असल्याचे लक्षात येताच समाविष्ठ गावांतील महिला सदस्यांनी ‘विषय मंजूर केला नाही तर
कचरा कोंडी करू, असा इशारा दिला. एकही गाडी कचरा डेपोत येऊ देणार नाही. वेळ पडल्यास गाड्या पेटवू, यास प्रशासन आणि विरोधक जबाबदार असतील.’’
माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ‘‘वेस्ट टू एनर्जी’चा विषय चांगला आहे. शहरातील कचºयाचा प्रश्न सुटण्यासाठी चांगले प्रकल्प होणे गरजेचे आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’चा कोट्यवधी रुपयांचा विषय आहे. या विषयाची सर्व नगरसेवकांना माहिती देणे गरजेचे होते. या कामाच्या ठेकेदारांचा एकच पत्ता आहे. त्यामुळे संशयाला वाव आहे. विषयाची सर्वांना माहिती द्यावी, तोपर्यंत हा विषय तहकूब ठेवावा.’’
चर्चेत मनसेचे गटनेते सचिन चिखले, विक्रांत लांडे, माया बारणे, हर्शल ढोरे, सुजाता पालांडे, उत्तम केंदळे, विकास डोळस, मीनल यादव, सुलक्षणा धर, डॉ. वैशाली घोडेकर, जावेद शेख, राहुल जाधव, निर्मला गायकवाड यांनी सहभाग घेतला.
अखेरीस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यानंतर महापौरांनी प्रकल्पाला मंजुरी दिली.
अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘ठेकेदार ब्लॅक लिस्टमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. पालिका ब्लॅक लिस्ट कंपनीला जागा देणार आहे का? हा विषय महत्त्वाचा आहे. त्याला आमचा विरोध नाही. माहिती दिली पाहिजे.’’
विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘चांगल्या आणि निवडक कामाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही. प्रशासनाकडून काय उणिवा राहिल्या आहेत. त्या दुरुस्त केल्या पाहिजेत.’’ सोनाली गव्हाणे म्हणाल्या, ‘‘कचºयाचा प्रश्न सुटणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु, विरोधक त्याला विरोध का करत आहेत, हे समजत नाही.’’
नाना काटे म्हणाले, ‘‘वेस्ट टू एनर्जीचे काम करणारा ठेकेदार चार ते पाच ठिकाणी ब्लॅक लिस्टमध्ये आहे.’’
सुवर्णा बुर्डे म्हणाल्या, ‘‘प्रकल्पाला विरोधक विरोध करीत आहेत. हे चुकीचे आहे. विरोध केल्यास सोमवारपासून मोशीत आम्ही कचरा गाडी येऊ देणार नाही. पालिकेसमोर आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, कचºयाच्या गाड्या पेटवून दिल्या जातील.’’
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘पालिकेचे पैसे या प्रकल्पासाठी कशासाठी टाकायचे. २१ वर्षांसाठी हे काम आपण का देणार आहोत.’’
प्रमोद कुटे म्हणाले, ‘‘एवढा मोठा प्रकल्प असताना त्याची नगरसेवकांना माहिती का दिली नाही.’’
सारिका बोºहाडे म्हणाल्या, ‘‘हा प्रकल्प झाल्यास कचºयाची समस्या सुटणार आहे. परंतु, एवढ्या चांगल्या प्रकल्पाला विरोधक विरोध करत आहेत. हे चुकीचे आहे.’’