...तेव्हा भारतीय जवान देवदूत म्हणून धावून आले; अमरनाथ यात्रेत थरकाप उडालेल्या भाविकांचा अनुभव
By नारायण बडगुजर | Published: July 31, 2022 01:08 PM2022-07-31T13:08:28+5:302022-07-31T13:08:35+5:30
जवानांमुळेच अमरनाथ यात्रा सफल होऊ शकते, हे त्यावेळी समजले
पिंपरी : अमरनाथ येथे शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर काही क्षणातच आकाश अंधारून आले. भरदुपारी काळोख झाला. त्यावेळी अमरनाथ गुफेपासून पंचतरणीपर्यंतचे चार किलोमीटर अंतर भरपावसात चालत जाताना सर्वांचाच थरकाप झाला होता. हा काळोख म्हणजे जणू काळच आहे, असे वाटून मनात भीतीचे काहूर उठले होते. तेव्हा सैन्य दलाचे जवान मदतीला धावून आले. आमच्यासाठी खऱ्या अर्थाने ते देवदूतच ठरले. त्यांच्यामुळेच अमरनाथ यात्रा सफल होऊ शकते, हे त्यावेळी समजले, असा अनुभव धनकवडीचे राहुल महाराज तळेकर शास्त्री यांनी कथन केला.
पुणे व पिंपरी-चिंचवडसह परिसरातील ५५ भाविकांचा एक गट अमरनाथ यात्रेसाठी गेला आहे. यात धनकवडी येथील राहुलमहाराज तळेकर हे आहेत. तळेकर व इतर भाविक जण २७ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास अमरनाथ गुहेजवळ पोहचले. त्यातील काही जणांना लगेचच दर्शन घेता आले. मात्र १९ जणांना दर्शनासाठी अडीच तासाचा वेळ गेला. दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास वातावरणात मोठा बदल झाला. ढगांची गर्दी झाल्याने अंधारून आले. त्यामुळे सैन्य दलाच्या जवानांनी भाविकांना सूचना केली. त्यानुसार भाविकांनी तेथून बालटालच्या दिशेने निघण्यासाठी लगबग केली. दरम्यान, जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच भरदुपारी मोठा काळोख झाला. त्यामुळे सर्वच भाविक घाबरले. गुफेपासून पंचतरणी येथे १९ भाविक पोहचले असता पायी मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे पंचतरणीपासून बालटालच्या दिशेने येणारा मार्ग तसेच हेलिकाॅप्टर सेवाही बंद करण्यात आली. जवानांनी दोन ते अडीच हजार भाविकांना पंचतरणी येथे थांबवले.
काळोख आणि पाऊस कमी होत नव्हता. त्यामुळे बुधवारी भाविकांना पंचतरणी येथे मुक्काम करावा लागला. वातावरणात बदल होईल या अपेक्षेने पुणे, पिंपरीतील भाविकांसह शेकडो भाविक गुरुवारी (दि. २८) पहाटे साडेपाचपासून हेलिपॅडवर पोहचले. मात्र, दिवसभर वातावरण खराबच राहिले. त्यामुळे भाविकांना हेलिपॅडवर दिवसभर एकाच ठिकाणी बसून रहावे लागले. पावसामुळे लंगर घेण्यासही त्यांना जाणे शक्य झाले नाही. सोबत असलेली बिस्किटे आणि पाणी यावर दिवस काढावा लागला. हेलिकाॅप्टर सेवा सुरू होणार नसल्याने दुपारी तीननंतर भाविक हेलिपॅडवरून पंचतरणी येथे पालाकडे पोहचले.
पंचतरणी येथे गुरुवारी मुक्काम करावा लागला. मुक्कामादरम्यान जवानांनी सर्व भाविकांशी संवाद साधला. मनोधैर्य उंचावले. खचून जाऊ नका, सगळे सुरळीत होईल. तुम्ही सगळेजण सुरक्षित पोहोचाल, असे जवानांकडून सातत्याने सांगण्यात येत होते, त्यामुळे भाविकांना बळ मिळाले. शुक्रवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली. मात्र, वातावरण निवळले. त्यामुळे सकाळी नऊपासून हेलिकाॅप्टर सेवा सुरू झाली आणि सर्व भाविक सुरक्षितपणे बालटाल येथे दाखल झाले.
जवानांनी पाणी, अन्न दिले
गुफेपासून पंचतरणीपर्यंत चालत जाणाऱ्या भाविकांना जवानांनी त्यांच्याकडील बिस्कीट, खाद्यपदार्थ तसेच पाणी दिले. त्यामुळे दोन आजींना मोठा दिलासा मिळाला. तसेच एका ज्येष्ठ नागरिकालाही धाप लागून त्रास जाणवत होता. त्यालाही जवानांनी मदत केली. त्यामुळे तो भाविकही पालापर्यंत पोहोचू शकला.
''ढगफुटी झाली, दरड कोसळली, नदीला महापूर आला तर काय होईल, अशा अनेक प्रश्नांनी मनात भीती घातली होती. बालटाल येथून परतीच्या प्रवासातही कंगण या गावाजवळ पावसामुळे दरड कोसळली. त्यामुळे आमची बस एक तास थांबविली. तेव्हा आम्ही सर्व भाविक घाबरलो होतो. भारतीय जवानांनी दरड बाजूला केल्यानंतर प्रवास सुरू झाला. जवानांमुळेच ही यात्रा सफल झाली. त्यांच्यामुळेच भाविक सुरक्षित राहतात. त्यामुळे ते देवदूतच आहेत. - राहुल महाराज तळेकर शास्त्री, धनकवडी, पुणे''