मातब्बर राजकीय घराण्यांतील लढत
By admin | Published: February 15, 2017 02:03 AM2017-02-15T02:03:50+5:302017-02-15T02:03:50+5:30
जिल्हा परिषदेच्या इंदोरी-सोमाटणे गटात सर्वसाधारण जागेसाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, भारतीय जनता पक्ष
तळेगाव दाभाडे : जिल्हा परिषदेच्या इंदोरी-सोमाटणे गटात सर्वसाधारण जागेसाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांत मुख्य लढत होत आहे. लक्षवेधी लढतीमुळे
दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रदीप चंद्रकांत
शिंदे यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली. कॉँग्रेस पक्षाने या
गटात उमेदवार उभा केलेला नाही. या गटात शिवसेना व कॉँग्रेस कोणती भूमिका घेते हेही महत्त्वाचे ठरणार आहे. राजकीयदृष्ट्या दोन मातब्बर घराण्यातील या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. भाजपाने पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य नितीन मराठे
यांना निवडणुकीच्या रिंगणात
उतरवले आहे. रवींद्र किसन
गायकवाड हे अपक्ष उमेदवार आहेत. शिंदे हे पंचायत समितीचे
माजी सभापती असून, इंदोरी गावचे माजी सरपंच आहेत. यापूर्वी त्यांनी इंदोरी गणातून प्रतिनिधित्व केले आहे. मराठे हे वराळेगावचे माजी सरपंच आहेत. मिनी आमदारकी म्हणून या गटाकडे पाहिले जाते.
इतिहास पाहता भाजपाला अनुकूल असलेला हा गट आहे. मागील तीन निवडणुकीत भाजपाच्या सुमित्रा जाधव, प्रशांत ढोरे व सविता गावडे यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. गटात भाजपाचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निवासस्थान येते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे यांचे निवासस्थान याच गटात आहे. भेगडे व दाभाडे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी लागणार आहे.
सर्व साधारण जागेसाठी निवडणूक होत असल्याने गटात अजूनही अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात. भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ मोठा असून, प्रचारास कमी कालावधी असल्याने उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. दोन्ही उमेदवारांचा निवडणुकीत कस लागणार असून, गटातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. गटात उमेदवारांसह नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तळेगाव शहराला लागून असलेल्या तळेगाव ग्रामीणचा बराचसा भाग या वेळी नव्याने इंदोरी सोमाटणे गटामध्ये समाविष्ट करण्यात आलेला
आहे. शिवसेना व कॉँग्रेसच्या मतांनाही महत्त्व येणार आहे. या गटात अर्थकारण महत्त्वाचे ठरणार
आहे.
इंदोरी-सोमाटणे या गटामध्ये इंदोरी, सुदवडी, माळवाडी, वराळे, तळेगाव ग्रामीण, सोमाटणे, ओझर्डे, आढे, बेबडओहळ, पिंपळखुटे, उर्से, परंदवडी, धामणे, गोडुंब्रे, शिरगाव, गहुंजे, शिवणे, सडवली या गावांचा समावेश होतो. मतदारसंघात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावाचे नाव गट व गणाला देण्याच्या निकषाप्रमाणे इंदोरी-उर्से या गटाचे नाव बदलून ते इंदोरी - सोमाटणे असे झाले आहे. गटात अनेक अनेक औद्योगिक कारखाने आहेत. सोमाटणे फाटा परिसरात अनेक नामवंत हॉस्पिटल्स आहेत. मतदारात शेतकरी आणि कामगारांची संख्या अधिक आहे. (वार्ताहर)