विधानसभा जागा वाटपाची चर्चाच नाही, काळजी करू नका-संजय राऊत
By विश्वास मोरे | Published: July 18, 2024 09:25 PM2024-07-18T21:25:05+5:302024-07-18T21:25:14+5:30
भोसरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट
पिंपरी : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडी भोसरीची जागा पवार गटाला जाणार, याबाबतची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट अस्वस्थ झाला आहे. शिवसैनिकांनी मुंबईत नेत्यांची भेट घेतली. त्यावर ''जागा वाटपाची चर्चाच नाही काळजी करू नका, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसनिकांना समजावले आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीस शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन अहीर, नेते रवींद्र मिर्लेकर, विनायक राऊत, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे आदी उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील भोसरीतील नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. प्रवेश होताच भोसरी विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाने ठोकल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत, अस्वस्थ आहेत, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
त्यावर संजय राऊत यांनी अद्यापपर्यंत विधानसभेच्या जागा वाटपांबद्दल महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही चर्चा झालेल्या नाही. त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणाला हे ठरलेले नाही. कुणीही काहीही दावे दावे करीत असेल, तर त्याकडे लक्ष देऊ नका. आघाडीतील सर्व पक्षाचे जेष्ठ नेते निर्णय घेतील. त्यामुळे सर्वानी पक्ष संघटनेचे काम करा, अशा सूचना राऊत यांनी केल्या. माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, तुषार सहाने, परशुराम आल्हाट, सचिन सानप, अविनाश वाळके, शैलेश मोरे आदी शिवसेनेचे नेते उपस्थित होते. ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या, ' भोसरी विधानसभा हा परंपरागत मतदार शिवसेनेचा आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आम्ही आमची भूमिका मांडली आहे.'