राज ठाकरेंना भाजपात घेऊन काहीही फायदा नाही; रामदास आठवले यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 08:49 PM2022-04-03T20:49:29+5:302022-04-03T20:49:45+5:30
राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमते पण मत किती मिळतात, हा खरा प्रश्न
पिंपरी : राज ठाकरे यांना भाजपत घेऊ नये, या विचारांचा मी आहे. त्यांच्या फक्त सभांना गर्दी जमते. मत किती मिळतात, हा खरा प्रश्न आहे. त्यांना घेऊन भाजपला काहीही फायदा नाही, अशी स्पष्ट भूमिका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड शहरात मांडली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत मशिदींवरील भोंग्यांवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली. त्यावर आठवले म्हणाले, मशिदींवरील भोंगे हे मुस्लिम बांधवांची परंपरा आहे. पूर्वी हे भोंगे ऐकून आपल्याला जाग येत असे. त्यांच्या भोंग्यांसमोर हनुमान चालिसा लावणे योग्य नाही. दोन्हीही एकमेकांच्या समोर भोंगे न लावता एकमेकांना त्रास होणार नाही, असे भोंगे लावावेत.
राज ठाकरे नाही, शिवसेना फायद्याची
शिवसेनेवर टीका करताना आठवले म्हणाले, राज ठाकरे यांचा भाजपला कोणताही फायदा नाही. त्यांची भाषणे ऐकायला लोक येतात. मत किती मिळतात, असा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपत राज ठाकरे यांना घेण्यास रिपब्लिकनचा विरोध आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती केली ही चांगली बाब नाही. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेने भाजपबरोबर यावे, मुख्यमंत्री पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्मुला करावा, यासाठी मी आग्रही आहे. १९९२ मध्ये काँग्रेस आरपीआय युतीने चमत्कार केला होता. तसाच शिवसेना आणि भाजप-आरपीआयने एकत्र येऊन सरकार स्थापावे.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जातीपातीचे राजकारण करतात
राष्ट्रवादी काँग्रेस जातीपातीचे राजकारण करते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. त्यावर आठवले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करतात, असे मी म्हणणार नाही. मात्र, कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या वेळी आजूबाजूच्या गावांतील राष्ट्रवादीच्या लोकांनी जातीपातीचे राजकारण केले. राष्ट्रवादीचे स्थानिक लोक राजकारण करतात, असे माझे मत आहे. वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षात यावे, आम्ही बरोबर काम करण्यास उत्सुक आहोत.