वडगाव मावळ तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही; अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 09:31 AM2020-04-03T09:31:07+5:302020-04-03T09:31:28+5:30
महिलेला कोरोना झाल्याची अफवा
मावळ : पुणे, मुंबई व इतर राज्यातून आलेल्या ३ हजार ७८३ व्यक्ती आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे व नियंत्रण कक्षाचे संनियंत्रक राहूल चोकलिंगम यांनी दिली मावळ तालुक्यातील ९१ हजार ५०० घरांची तपासणी करण्यात आली असून परदेश प्रवास करून आलेले १११ व त्यांच्या सहवासातील १३६व्यक्ती अशा २४७ जणांना आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असून त्यांची दररोज तपासणी केली जाते.
थायलंड, जर्मनी, अमेरीका व इतर परदेश दौऱ्यातून मावळ तालुक्यात परतलेल्या व्यक्ती आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून परदेशातून परतलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना त्यांच्याच घरात विलगीकरण कक्ष तयार करुन १४ दिवस ठेवण्यात येत आहे. तालुक्यातील वडगाव,तळेगाव, कामशेत, लोणावळा या शहरासह अन्य शहरे तसेच खेड्यापाड्यातील प्रत्येक गावात आशा व आरोग्य खात्याचे डॉक्टर या पदकाद्वारे तपासणीचे काम सुरू आहे .आत्तापर्यंत तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका. स्वताची व कुटूबीयांची काळजी घ्या असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे यांनी केले आहे.
महिलेची अफवा..
सोमाटणे फाटा होम क्लारंटाईन केलेल्या व्यक्तीच्या आईला कोरोना झाल्याची अफवा कोणीतरी पसवल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमाटणे येथील एका सोसायटीत १९ मार्च रोजी थायलंड येथून एक युवक आला होता. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या आईला ताप आला होता. म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पिपरी येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. शिवाय संबंधित रूग्णाच्या वडिलांना घरीही सोडण्यात आले. त्यामुळे हा रूग्ण कोरोनाबाधित नाही. तहसीलदार मधुसुदन बर्गे,आमदार सुनील शेळके, आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. कुणीही घाबरू नये असे आवाहन करण्यात आले. यापुढे अफवा पसविल्यास त्वरीत गुन्हा दाखल करण्यात येईल असा ईशारा दिला आहे.