शहरात तीन वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात नाही एकही नवी बस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:58 AM2019-01-25T01:58:47+5:302019-01-25T01:58:53+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) मागील तीन वर्षांत एकही बस पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली नाही.
- शीतल मुंडे
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) मागील तीन वर्षांत एकही बस पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना जुन्या आणि नादुरुस्त बसमध्ये प्रवास करावा लागत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कुठल्याही रस्त्यावर किमान एकतरी बस बंद पडलेली दिसते. शिवाय पीएमपी ताफ्यात दर वर्षी व प्रत्येक महिन्याला बस स्क्रॅप होत आहे.
पीएमपीच्या ताफ्यात २०१२ ते २०१४ या तीन वर्षांत एकही बस दाखल नाही. त्यानंतर २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत केवळ बारा नव्या बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. २०१८ मध्ये जुन्या झालेल्या आणि वैधता संपलेल्या १०२ बसेस स्क्रॅप करण्यात आल्या. यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील जुन्या बसचा भरणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याच बसचे बे्रकडाऊनचे प्रमाणदेखील अधिक आहे. रस्त्यावरील पीएमपी बस ब्रेकडाऊनची वाढती संख्या, खिळखिळ्या बस व धूर सोडून प्रदूषण वाढविणाऱ्या बस यामुळे प्रवाशांकडून बसबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे. पीएमपीच्या ताफ्यात जुन्या बसेसची संख्या वाढलेली आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वापर करण्यात आलेल्या एकूण १६५ बस आताच्या स्थितीला पीएमपीच्या ताफ्यात आहेत. ११ ते १२ वर्षे झालेल्या १९० बस आहेत. जुन्या बसमुळे तक्रारीमध्ये वाढ होत आहे. नवीन बस खरेदीबाबत पीएमपी प्रशासन उदासीन असल्याचे सातत्याने समोर आले आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना व नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर बंद पडणाºया पीएमपी बस, ब्रेकडाऊन होण्याचे वाढलेले प्रमाण, बसमधून विचित्र आवाज येणे, बसमधून काळा धूर निघणे, बसला आग लागणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.
>पीएमपी ताफ्यामध्ये भंगार बसचे प्रमाण अधिक आहे. काही भंगार बसमुळे प्रदूषणात वाढ होते. पीएमपीच्या ताफ्यात २०१३ - १४ या आर्थिक वर्षात एकही बस पीएमपी प्रशासनाने खरेदी केलेली नाही. २०१४-१५ या आर्थिक वर्षातदेखील पीएमपी प्रशासनाने बस खरेदी केली नाही. २०१५-१६ या आर्थिक वर्षात पीएमपी ताफ्यात मात्र ११ बस दाखल झाल्या होत्या. त्यांनतर २०१८ च्या शेवटी २०० मीडी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. पीएमपी ताफ्यात नव्या बस नसल्याने जुन्या बसचा वापर सुरू आहे. - सुभाष गायकवाड,
जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल
>पीएमपीच्या बहुतांश बसची स्थिती अतिशय खराब आहे. एखाद्या बसमध्ये बसलो तरीदेखील आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तिथपर्यंत आपण पोहोचणार किंवा नाही, याची खात्री नसते. त्याचे कारणही तसेच आहे. पीएमपीची बस कुठेही बंद पडते. त्यानंतर दुसºया बस बदलत जावे लागते. यामुळे वेळदेखील जास्त जातो. एकतर एक-दोन तासानंतर बस येते एकतर बसला गर्दी जास्त असते. - मोहिनी पवार, प्रवासी