संतपीठावर बोलले नाही, म्हणून विरोधीपक्षनेत्यांची वरिष्ठांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:14 PM2019-01-04T13:14:54+5:302019-01-04T13:20:44+5:30
महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ होणार आहे.
पिंपरी : महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ होणार आहे. स्थायी समितीत पाच कोटी वाढीव खर्चाच्या प्रस्ताव आला असताना मत न मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची तक्रार विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
संतपीठावर समिती आणि कामाची वाढीव निविदा यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुपली आहे. वाढीव खचार्चा विषय स्थायी समितीसमोर आला होता. स्थायीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर असे चार सदस्य आहेत. संतपीठासाठी महापालिकेने चाळीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत गृहित धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या. त्याला पाच कोटी वाढीव देण्यात आले. स्थायीच्या बैठकीत वाढीव खर्चास मान्यता दिली. या वाढीव खर्चाच्या प्रस्तावावर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने मौन बाळगले. तसेच सभा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संतपीठाचा विषय तहकूब केल्याचे माध्यमांना सांगितले. विरोधी नगरसेवकांच्या भुमिकेविषयी संशय निर्माण झाल्याने विरोधीपक्षनेत्यांनी याबाबत आपली नाराजी पक्षश्रेष्ठींना कळविली आहे. दत्ता साने म्हणाले, स्थायी समितीत विषय आल्यानंतर आमच्या सदस्यांनी भूमिका घेणे गरजेचे होते. ती न घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन पक्षाचे नेतृत्व योग्य ती कारवाई करतील.
.......................
समितीत बदल करण्याचा अधिकार दिला कोणी?
भाजपावर टीका करताना साने म्हणाले, भाजपने देवाच्या कामात देखील पैसे खालले आहेत. संतपीठाची संकल्पना राष्ट्रवादीची होती. आम्हीच त्याला मंजूरी दिली. त्यासाठी लागणारी जागाही ताब्यात घेतली. संतपीठाचे श्रेय घेऊ पाहणारे त्यावेळी आमच्या पक्षात होते. आता भाजपमध्ये सत्तेत असतानाही त्यांनी संतपीठाची उर्वरित जागा ताब्यात घेता येत नाही. संतपीठाच्या समितीत पाच सदस्य हे संतसाहित्याचे अभ्यासक असावेत, असा ठराव केला होता. मात्र, त्यातील एक सदस्य कायम ठेऊन अन्य सदस्य बदलले आहेत. हा अधिकार दिला कोणी. संतपीठाच्या कामामध्ये रिंग झाली आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. सर्वसाधारणसभेत ते पुरावे सादर करणार आहे.