जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेला गिळंकृत करत असल्याच्या तीव्र भावना होत्या - श्रीरंग बारणे
By विश्वास मोरे | Published: September 26, 2022 07:28 PM2022-09-26T19:28:36+5:302022-09-26T19:28:52+5:30
शिवसेना-भाजप युती राहिली पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली होती
पिंपरी : महाविकास आघाडीचे सरकार असताना मी तीन जिल्ह्यांचा दौरा केला. राष्ट्रवादी शिवसेनेला गिळंकृत करत आहे. पालकमंत्री शिवसैनिकांचे काम करत नाहीत. खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा तीव्र भावना होत्या. याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही पक्षप्रमुखांकडे दिला होता. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडत असतानाही सर्वजण एकत्र राहू, शिवसेना-भाजप युती राहिली पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली होती. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचाच निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत केला.
आताही चुकीची कामे रोखली जातील
आंदोलनाच्या रेट्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार चौरस फुटाच्या अवैध बांधकामांवरील शास्तीकर माफ झाला. शंभर टक्के शास्तीमाफीसाठी प्रयत्नशिल आहे. वषार्नुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, महापालिका निवडणूकीपूर्वी प्रश्न सोडवू, आजपर्यंत पालिकेतील चुकीच्या कामाला पाठिंबा दिला नाही. पाठिशी घातले नाही. आताही चुकीची कामे रोखली जातील, असेही बारणे म्हणाले.
मावळच्या जागेवर युतीचा उमेदवार
मावळची जागा भाजप की शिवसेनेस या प्रश्नावर बारणे म्हणाले, ‘‘मावळच्या जागेबाबत केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे मी आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच लढविणार आहे. शिवसेना पक्ष चिन्हाचा वाद निवडणूक आयोग, न्यायालयात आहे. येत्या काही दिवसात पक्ष चिन्हाचा वाद मिटेल. चिन्हही मिळेल. २०२४ अद्याप लांब आहे. चिन्हाबाबत अधिक बोलणार नाही.’’