महापालिकेची यंदा कोणतीही करवाढ नाही..! आगाऊ बिल भरणाऱ्यांना सवलती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:01 IST2025-01-30T13:00:43+5:302025-01-30T13:01:33+5:30
आगाऊ ऑनलाइन बिल भरणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे सामान्य करात सवलत देण्यात येणार

महापालिकेची यंदा कोणतीही करवाढ नाही..! आगाऊ बिल भरणाऱ्यांना सवलती
पिंपरी : शहरातील निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र आणि मोकळ्या जागा यांच्या मालमत्ता करात २०२५-२६ या वर्षासाठी कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. सध्याचेच दर पुढील वर्षासाठी कायम ठेवले जाणार आहेत. आगाऊ ऑनलाइन बिल भरणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे सामान्य करात सवलत देण्यात येणार आहे.
शहरातील निवासी व बिगरनिवासी अशा एकूण ६ लाख ३५ हजार मालमत्तांची नोंद महापालिकेकडे आहे. मालमत्ता करात वाढ करण्यासाठी २० फेब्रुवारीपूर्वी त्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार करसंकलन विभागाने सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यात कोणतीही दरवाढ न करता, सध्याच्याच दरास मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकांनी मालमत्ता करात यंदाही कोणतीही वाढ केली नाही, ही बाब शहरवासीयांना दिलासा देणारी आहे.
असे असतील सामान्य कराचे दर...
एक ते १२ हजार रुपये करयोग्य मूल्य असलेल्या निवासी मालमत्तांना १३ टक्के सामान्य कर दर आहे. बिगरनिवासी मालमत्तांना १४ टक्के सामान्य कर आहे. १२ हजार १ रुपये ते ३० हजार रुपये करयोग्य मूल्य असलेल्या निवासी मालमत्तांना १६ टक्के आणि बिगर निवासी मालमत्तांना १७ टक्के सामान्य कर दर आहे. ३० हजार १ रुपये ते त्यापुढील करयोग्य मूल्य असलेल्या निवासी व बिगर निवासी मालमत्तांना २४ टक्के सामान्य कर लावला जातो.
इतर करांचे दर
साफसफाई कर निवासी मालमत्तांना ५ टक्के व बिगर निवासी मालमत्तांना ६ टक्के आहे. अग्निशामक कर निवासी व बिगर निवासी मालमत्तांना २ टक्के आहे. महापालिका शिक्षण कर निवासी मालमत्तांना ४ टक्के आणि बिगर निवासी मालमत्तांना ५ टक्के आहे. मलप्रवाह सुविधा लाभ कर निवासी व बिगर निवासीसाठी ५ टक्के, पाणीपुरवठा लाभ कर निवासी मालमत्तांना ४ टक्के व बिगर निवासी मालमत्तांना ५ टक्के आहे. रस्ता कर निवासी मालमत्तांना २ टक्के व बिगर निवासी मालमत्तांना ३ टक्के आहे. वृक्षकर निवासी व बिगर निवासीसाठी एक टक्का आहे.
दोन टक्के साफसफाई कर
मॉल, लॉजिंग बोर्डिंग, मंगल कार्यालय, सभागृह, रुग्णालय, हॉटेल्स, कँटिन, रेस्टॉरंट या मालमत्तांना २ टक्के विशेष साफसफाई कर आहे. नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, नाटक, सर्कस, संगीत कार्यक्रम, कुस्ती, मुष्टियुद्ध यांना प्रत्येक खेळास ५० रुपये ते ३५० रुपये करमणूक कर आहे.
यांना मिळणार सवलती
आगाऊ व ऑनलाइन बिल भरणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे सामान्य करात सवलत देण्यात येणार आहे. महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी, ग्रीन बिल्डिंग, कंपोस्टिंग, एसटीपी, झिरो वेस्ट यंत्रणा असलेल्या निवासी मालमत्ता, शैक्षणिक इमारती, इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास सवलत दिली जाणार आहे.