नववर्षात 'बेशिस्त'वाहनचालक असणार पोलिसांच्या रडारवर; कारवाई होणार अधिक तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 09:09 PM2020-12-31T21:09:48+5:302020-12-31T21:10:27+5:30
कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यापासूनच गुन्हेगारांना पळो की सळो केले
पिंपरी : वाहतुकीला शिस्त लावण्यासह रस्ते अपघात टाळण्याचा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नववर्षानिमित्त संकल्प केला आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. बेशिस्तपणे वाहन चालविणे, हाॅर्न तसेच कानठळ्या बसविणारे सायलेंसर असलेल्या दुचाकीचालक त्यात रडावर राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे रोखण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी विविध पथके स्थापन केली. तसेच संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपारीसह मोकाच्या कारवाईवर भर दिला. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांची गुन्हेगारी कृत्ये कमी झाली. कोरोना काळात पोलिसांची प्रतिमा उजळण्यासाठी तत्कालीन आयुक्त संदीप बिष्णोई यांनी प्रयत्न केले. परिणामी शहर पोलीस दलाबाबत शहरवासीयांमध्ये सकारात्मक संदेश गेला.
कृष्ण प्रकाश यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यापासूनच गुन्हेगारांना पळो की सळो केले. अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला. त्यामुळे अवैध मद्यविक्री, गुटखा, अमलीपदार्थ विक्री, वाहतूक, साठा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परिणामी शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली आहे. गुन्हेगारीसोबतच शहरात वाहतुकीशी संबंधित काही समस्या आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होते. यात मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकार समोर आले आहेत. मद्यपी वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढते. अशा वाहनचालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुक्तांनी त्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
वाहतूक विभागाकडून कारवाईचा धडाका
पोलिसांच्या वाहतूक शाखेंतर्गत १० विभाग कार्यान्वित आहेत. प्रत्येक विभागांतर्गत ठिकठिकाणी वाहनांची तपासणी, वाहतूक नियमन आदी केले जाते. याहस वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. ती कारवाई अधिक प्रभावी करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.