'थेरगाव क्वीन'चा धुमाकूळ सुरूच; इंस्टाग्रामवर ४० पेक्षा जास्त अकाउंट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:45 PM2022-02-11T12:45:35+5:302022-02-11T12:48:25+5:30
थेट पोलिसांना आव्हान दिले जात आहे...
पिंपरी : धमकीवजा व अश्लील भाषेत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 'थेरगाव क्वीन'च्या नावाने सोशल मीडियावर ४० पेक्षा अधिक अकाऊंट असल्याचे समोर आले आहे. या अकाउंटवरून व्हिडिओ व्हायरल करून खोडसाळपणा केला जात आहे. तसेच थेट पोलिसांना आव्हान दिले जात आहे.
सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढावेत म्हणून काही जणांकडून विविध शक्कल लढवली जाते. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील काही तरुणांकडून धमकीवजा अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. यातून समाजस्वास्थ्य बिघडविण्याचे कृत्य केले जात आहे. त्यामुळे वाकड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून थेरगाव येथील एका तरुणीला अटक केली होती. तसेच तिच्या साथीदार 'भाई'ला देखील पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यापुढे असे व्हिडिओ करणार नाही, असे म्हणत या 'भाई'ने माफी मागितली होती.
त्यानंतरही इंस्टाग्रामवरील 'थेरगाव क्वीन' नावाच्या अकाउंटवरून थेरगाव क्वीन' असलेल्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यातून थेट पोलिसांनाच आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी 'थेरगाव क्वीन' असलेल्या संबंधित तरुणीकडे याबाबत चौकशी केली. व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले इंस्टाग्रामवरील अकाउंट संबंधित तरुणीचे नसून त्या पद्धतीचे ४० पेक्षा जास्त अकाउंट असल्याचे समोर आले. हे सर्व अकाउंट कोणाचे आहेत, ते अकाउंट कोण ऑपरेट करीत आहेत, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये. तसे झाल्याचे दिसून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इंस्टाग्रामवर 'थेरगाव क्वीन' नावाने असलेल्या सर्व अकाऊंटची माहिती घेण्यात येत आहे. त्यात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अकाउंट धारकांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे