थेरगावातील खड्डे बुजविले, वाहनचालकांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:27 AM2018-08-31T01:27:01+5:302018-08-31T01:27:18+5:30
महापालिका : डांगे चौक ते काळेवाडी फाटा मुख्य मार्गावरील रस्त्यांसह अनेक भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते,
थेरगाव : डांगे चौक ते काळेवाडी फाटा मुख्य मार्गावरील रस्त्यांसह अनेक भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत पालिकेने डांबर टाकून येथील खड्डे बुजविले.
वाकड येथील १६ नंबर ते काळेवाडी फाटा या १०० मीटरच्या अंतरात रस्त्यावर ४० ते ५० मोठे खड्डे होते. त्यामुळे वाहनचालकांनायेथे कसरत करावी लागत होती. कावेरीनगर येथील भुयारी मार्गासमोरच रस्ता उखडून मोठे खड्डे झाले होते. भुयारी मार्गातून थेट खड्ड्यांत वाहने जात होती. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अनेक अपघात झाले होते. लहान-मोठ्या खड्ड्यांमधील खडी बाहेर येऊन त्या जागेवर सतत वाहनांची आदळआपट सुरू असल्याने खड््ड्यांचा आकार वाढतच होता.
मार्च ते मे या कालावधीत डांबरीकरण, डागडुजी केलेल्या रस्त्यांवरील खडी पावसाच्या पाण्यामुळे उखडली होती. गेल्या महिन्यात खड्डे तात्पुरते बुजविण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात पावसाने पुन्हा खडी उखडून खड्डे झाले. डांगे चौक ते काळेवाडी फाटा या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता उंच तर काही ठिकाणी सखल झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी चेंबरची समपातळी नसल्याने या भागात वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे या रस्त्यावरची वाढती वाहतूक लक्षात घेता प्रशासनाने रस्त्यावरच्या रहदारीचा जीव मुठीत घेऊन होणारा प्रवास सुखकारक होण्यासाठी वारंवार तात्पुरती मलमपट्टी न करता कायमच्या उपाययोजनेची मागणी होत आहे.