'कट्यार पाठीत घुसली,चा त्यांनी प्रयोग केला, आम्हीही केला "आता होती गेली कोठे' चा प्रयोग: देवेंद्र फडणवीस
By विश्वास मोरे | Published: January 7, 2024 10:06 PM2024-01-07T22:06:00+5:302024-01-07T22:07:54+5:30
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा संपन्न
डॉ. विश्वास मोरे
चिंचवड- तिसरी घंटा वाजली की नाटक सुरु होते, आमचेही तसेच आहे. राजकारणामध्ये तिसरी घंटा म्हणजे आचारसंहिता लागते ती वेळ. तेव्हा आम्ही पोझिशन घेतो. एक गोष्ट खरी आहे कि, चांगल्या तालमी केल्या कलावंताना रसिकांचा आशीर्वाद मिळतो. तसेच आमचेही आहे. जे नुसतीच नाटके करतात, त्यांना लोक घरी बसवतात.२०१९ ला एक प्रयोग झाला. कट्यार काळजात नाही, तर पाठीत घुसली. त्यानंतर आम्हीही प्रयोग केला, आता होती गेली कुठे? , असे प्रयोग होताच असतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात लगावला.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतर सोहळ्यात फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, संयोजक भाऊसाहेब भोईर, मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते. सोलापूर नाट्य परिषदेकडे मान्यवरांच्या हस्ते नटराज आणि घंटा सुपूर्द केली.
ओटीटीच्या काळात देखील नाटक संपलेलले नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्रेक्षकांच्या निकट जो असतो तोच खरा अभिनेता असतो. पूर्वी राजकीय नेत्यांना संमेलनात बोलावले की, टीका व्हायची पण आता चित्र बदलले आहे. आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स कडे संवेदनशिलता नाही. कितीही आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स आलं तरी संगीत, नाट्य, कला यावर परिणाम होणार नाही. आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स मानवी संवेदना देवू शकणार नाही. मराठी रंगभूमी ही सर्वोत्तम आहे. ती टिकवावी लागेल. शाश्वत मूल्य लक्षात घेवून २१ व्या शतकातील मूल्य ओळखावी लागतील. ओटीटीच्या काळात देखील नाटक संपलेलले नाही. जोवर मराठी रसिक जीवंत आहे तोवर नाटक संपणार नाही."
शंभरावे नाट्य संमेलन हे केशराचं उद्यान असावं
''अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाटकाला केशराचं शेत म्हटले होते, मला वाटते शंभरावे नाट्य संमेलन हे केशराचं उद्यान असावं, केशरी रंग आम्हाला प्रिय आहे. सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे, राज्याचा अमृतकाळ लवकरच सुरू होईल त्या काळात नाट्य क्षेत्र नक्की कुठे असेल याची कल्पना आम्हाला येणार नाही, मात्र तुम्ही नाट्य क्षेत्रातील लोकांनी आम्हाला सांगा नेमके व्हीजन काय असावे? ते पूर्णत्वास नेण्यास आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.